गणेश यादव
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यासाठी निमित्त ठरले ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ विधानसभा मतदारसंघात मध्यवर्ती केंद्र असलेल्या तळेगाव दाभाडेचा समावेश येतो. मागील तीन वेळा मावळचा आमदार तळेगावमधीलच आहे. खासदार बारणे आणि आमदार शेळके यांचे चांगले संबंध होते. परंतु, तळेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीवरून त्यांच्यात बिनसले. तळेगावातील तत्कालीन सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक दिवंगत किशोर आवारे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बदली करून त्यांच्या जागी एन. के. पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. आवारे यांच्या मागणीवरून सरनाईकांच्या बदलीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याचे बारणे यांनी कबूल केले.
हेही वाचा… आजरा कारखान्याच्या निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ – सतेज पाटील या मित्रांमध्येच मुकाबला
त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत सरनाईक यांची मुदतपूर्व बदली झाली आणि त्यांच्या जागी एन. के. पाटील आले. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून मूलभूत नागरी सुविधाही मिळत नसल्याने तळेगाव शहरातील नागरिक हैराण झाले. नगर परिषदेच्या कारभारातही विस्कळीतपणा आला. बारणे यांनी अकार्यक्षम मुख्याधिकारी आणल्याची टीका शेळके यांनी केली. पाटील यांच्या नियुक्तीवरून बारणे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात मोठा कलगीतुरा रंगला होता. बारणे यांनी दहा वर्षांत केंद्राच्या निधीतून मावळमध्ये कोणती विकासकामे केली याचा लेखाजोखा मांडण्याची मागणी करत मावळ लोकसभेच्या जागेवर शेळके यांनी दावा केला. त्याला बारणे यांनीही प्रत्युत्तर देत मी जनतेला लेखाजेखा देण्यासाठी बांधील असून, कोणा व्यक्तीला नाही. शेळके कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत, असा सवाल केला होता.
हेही वाचा… तीन राज्यांमधील विजयानंतर राज्यातील भाजपचा अधिक जागांवर दावा ?
महायुतीतील मित्र पक्षांमधील खासदार बारणे आणि आमदार शेळके यांच्यात ज्या कारणावरून खडाखडी सुरू होती. त्या विजयकुमार सरनाईक यांची पिंपरी महापालिकेतून पुन्हा तळेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली. आमदार शेळके यांची पाटील यांच्या बदलीची मागणी मान्य झाल्याने खासदार, आमदारांच्या या लढाईत आमदार शेळकेंचा विजय झाल्याचे मानले जात आहे. शेळके यांच्या मनाप्रमाणे सरनाईक यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती केल्यानंतर आता तरी खासदार बारणे आणि शेळके यांच्यातील वाद थांबतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.