पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाची उमेदवारी निश्चित होताच माजी महापौर संजोग वाघेरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विरोधकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले माजी राज्यमंत्री, भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांची अभीष्टचिंतनानिमित्त भेट घेतली असली, तरी या भेटीची मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली. महाविकास आघाडीने उमेदवार निश्चित करून एक पाऊल पुढे टाकले असताना महायुतीत मात्र रस्सीखेच दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस-ठाकरे गट-शरद पवार यांच्या गटाच्या महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला आहे. त्यामुळे ठाकरे गटानेही तातडीने हालचाली करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना पक्षात घेतले. मावळमधून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. मावळमधून गद्दारी गाडण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मावळ मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे.

हेही वाचा : विजयाचा रंग भगवा की हिरवा ?

दुसरीकडे शिवसेना-भाजप-अजित पवार गटाच्या महायुतीत मावळ मतदारसंघ शिवसेनेला सुटेल असे सांगितले जात आहे. पण, भाजपचे बाळा भेगडे यांनी लोकसभा लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यासह संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भावी खासदार असा मजकूर असलेले भेगडे यांचे फलक झळकले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच भेगडे यांचे फलक झळकले. भेगडे यांनी केलेल्या जोरदार वातावरणनिर्मितीमुळे महायुतीत मावळची जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. असे असताना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे यांनी घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : वायएस शर्मिला लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, आंध्र प्रदेशच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

मावळवर आपलाच दावा असल्याचे सांगणाऱ्या शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी मुकाई चौक, किवळे येथे होणार आहे. मुख्यमंत्री काय बोलणार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maval shivsena thackeray faction starts campaigning for lok sabha candidate sanjog waghere print politics news css