तानाजी काळे
इंदापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच कित्येक महिने भारतीय जनता पक्षाने ‘मिशन बारामती’ अभियान राबवून बारामती ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याकरता गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राजकीय ताकद दिली जात आहे. गेल्या दोन महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय जलशक्ती व अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यात इंदापुरात स्थानिक प्रश्नांचा आढावा घेतला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा सध्या प्रचाराच्या रणनीतीतील केंद्रबिंदू ठरला आहे.
सन १९९५ मध्ये महाराष्ट्रात भाजप, शिवसेना युतीचे सरकार अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सत्तेत आले. अपक्ष आमदारांचे तत्कालीन नेते हर्षवर्धन पाटील यांच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ घालून पाटील यांचे चुलते माजी खासदार शंकरराव पाटील यांना शरद पवार यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात उभे केले होते. मात्र, इंदापुरातून पवारांनी मतदानात आघाडी घेतली होती. या पार्श्वभूमीवर गेल्या २५ वर्षांत ‘मिशन बारामती’चा हा दुसरा प्रयोग इंदापुरातून सुरू होत आहे. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांना राजकीय ताकद देण्यात येत आहे. मात्र, पाटील यांच्याकडे कोणतेच महत्त्वाचे पद नसल्यामुळे इंदापुरातून भाजपच्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळेल हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा… शिंदे समर्थक आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबाग मुरुड मतदारसंघात २५२ कोटीचा निधी
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन इंदापुरात येऊन जाताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार आदींनी इंदापुरात हजेरी लावली. मात्र, एकेकाळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे शहरातील उजवे हात समजले जाणारे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्या घरी कर्मयोगी कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा यांच्या निधनानंतर सांत्वनाच्या निमित्ताने पवार कुटुंबीयातील सर्वच मान्यवरांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. गेल्या अनेक पिढ्या बावड्याच्या पाटील घराण्याशी राजकीय आणि कौटुंबिकदृष्ट्या घनिष्ठ संबंध असलेले इंदापूरचे शहा कुटुंब आणि पाटील यांच्यात सध्या इंदापूर शहर वासियांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदावरून आलबेल नसल्याची चर्चा आहे.
हेही वाचा… प्रकाश निकम : उपेक्षितांच्या सेवेसाठी तत्पर
बारामती लोकसभा मतदारसंघात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे इंदापूर शहर ज्यांच्या हाती पाच वर्षे होते, त्या शहा कुटुंबाची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याने शहा परिवाराच्या भूमिकेकडे तमाम इंदापूर तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live : अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात आज महत्त्वाची बैठक
इंदापुरात सन २०१४ पासून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत. त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देऊन ताकद दिली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत भरणे व पाटील यांच्या मतांमध्ये केवळ तीन हजारांच्या आसपास मतांचा फरक होता. त्यामुळे भाजपच्या मिशन बारामतीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या पारंपरिक रणनीतीने आव्हान देण्यात येत आहे.