मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी – गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र काहीही करून जिंकायचा आहे. त्यांना महाराष्ट्रात येणारे प्रकल्प त्यांच्या गुजरात राज्यात न्यायचे आहेत. दिल्लीत बसलेल्या या दोन नेत्यांना महाराष्ट्र चालविण्यास देऊ नका, असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी येथे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात काँग्रेसने आयोजित केलेल्या सद्भावना मेळाव्यात खरगे यांनी भाजपवर टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘चारशे पार’ चा नारा दिला. पण, त्यांना महाराष्ट्राने झटका दिला. नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही, तर हुकूमशहा बनून सत्ता नियंत्रित करू पाहात आहेत. जे काँग्रेस सरकारने आजपर्यंत उभारले, ते विकून मोदी देश चालवीत आहेत’, असा आरोप खरगे यांनी केला.

हेही वाचा : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?

प्राथमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकातून केंद्र सरकारने राज्यघटनेची प्रस्तावना हद्दपार केली आहे. मग शाळेत विद्यार्थ्यांनी काय केवळ रा.स्व. संघाची गाणी म्हणायची ? मोदींना राज्यघटना बदलायची होती, पण पुरोगामी महाराष्ट्राने त्यांना रोखले आहे. महाराष्ट्राच्या या कामगिरीची इतिहासात नोंद घेतली जाईल. विधानसभा निवडणुकासुद्धा लोकसभा निवडणुकी इतक्याच महत्त्वाच्या आहेत. विधानसभेत तुमचे आमदार अधिक आले, तरच राज्यसभेत सरकारला रोखू शकता, असे खरगे यांनी नमूद केले.

यावेळी राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार नितीन राऊत, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नसीम खान यांची भाषणे झाली.

‘राजीव गांधी शिवसेनेशी सुडाने वागले नाहीत’ – उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीत ‘चारशे पार’ करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना कधी नारा द्यावा लागला नव्हता. नारा न देता राजीव गांधी यांनी ‘चारशे पार’चा इतिहास घडविला. पण प्रचंड बहुमत मिळवूनही ते शिवसेनेशी कधी सुडाने वागले नाहीत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

हेही वाचा : चावडी: भजनाला आठ अन् भोजनाला साठ!

ठाकरे म्हणाले, ‘केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा शिवसेना विरोधात होती. राजीव गांधी यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सडेतोड टीका करीत होते. पण, काँग्रेसने कधी ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’ यांना पाठविले नाही. याला राज्य करणे म्हणतात. राजीव गांधी हे सभ्य, सुसंस्कृत व सज्जन नेते होते. काँग्रेसकडे सद्भावना होती, तर आमच्या जुन्या मित्रपक्षांकडे सूडभावना आहे.

माणसे कळायला वेळ लागतो’, अशी टीका ठाकरे यांनी भाजपवर केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या सोहळ्यात पाचव्या रांगेत बसविणे, याला सुसंस्कृत राजकारणी म्हणतात काय’? ‘राजीव गांधी यांनी ४१५ खासदार निवडून आल्यानंतरही सगळीकडे मीच पाहिजे, असे कधी केले नाही. प्रचंड बहुमत असताना त्यांनी पंचायत राज आणून सत्ता विकेंद्रीकरणाला चालना दिली. मोदींप्रमाणे कधी ‘ एक देश, एक निवडणूक’ असे म्हणाले नाहीत. ‘एक देश’ मध्ये महाराष्ट्र येतो की नाही? मग, महाराष्ट्रातील निवडणुका का घेत नाही’, असा सवाल ठाकरे यांनी केला.

हेही वाचा : Vishwa Hindu Parishad : दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून धर्म संम्मेलनाचं आयोजन; भाजपाच्या मदतीसाठी संघ परिवार मैदानात?

ठाकरे व्यासपीठावर आल्यावर त्यांच्या गळ्यात काँग्रेसचा तिरंगी दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले. त्याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, आम्ही सद् भावनेच्या बाजूने आहोत, हे जनतेला समजावे, म्हणून मी हा दुपट्टा घातला आहे.

योगदान पुसणे अशक्य शरद पवार

नेहरू कुटुंबीयांशी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची वागणूक योग्य नाही. देशासाठी नेहरू कुटुंबातील चार पिढ्यांनी योगदान दिलेले आहे. या कुटुंबाने देशाची जी पायाभरणी केली आणि देश उभा केला, त्याची नोंद कुणाला, काहीही करून पुसता येणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केले. राजीव गांधी यांचे श्रीपेराम्बुदूर येथे बॉम्बस्फोटात निधन झाले. त्या दुर्घटनेच्या आदल्या दिवशी रात्री राजीव गांधी यांची मुंबईत मोहंमद अली रोड येथे सभा झाली होती आणि ते त्या रात्री माझ्या ‘वर्षा’ निवासस्थानी मुक्कामाला होते, अशी आठवण पवार यांनी आपल्या भाषणात सांगितली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mallikarjun kharge appeals dont give maharashtra in the hands of modi and amit shah print politics news css