सिद्धेश्वर डुकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर मुंबईत गेल्या २४ वर्षांत पक्षाला बाळसे धरता आले नव्हते. अजित पवार यांच्या बंडाचा परिणाम मुंबई राष्ट्रवादीवरही झाला आहे. या परिस्थितीतही मुंबईत ताकद वाढविण्यावर शरद पवार गटाने भर दिला असून, सहा नव्या जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे. मुंबईत पक्ष वाढीचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसमोर मोठे आव्हान असेल. शरद पवार व जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका पार पाडून सहा जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका केल्या आहेत. या सहा नवीन जिल्हाध्यक्षांवर पक्षाचे पदाधिकारी वा कार्यकर्ते टिकवण्याचे तसेच पक्ष वाढवण्याचे आव्हान यापुढील काळात असणार आहे.

मुंबईतील पक्षाचे एकमेव आमदार व मुंबईचे माजी अध्यक्ष नवाब मलिक हे अटकेत आहेत. मलिक यांच्या तुरुंगात गेल्याने पक्षाने दोन कार्याध्यक्ष नेमले होते. या दोन कार्याध्यक्षांना प्रत्येकी तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती. यापैकी एक कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांच्याप्रमाणे शिवाजीराव नलावडे,नंदु काटकर या मुंबईतील नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली. तर दुसऱ्या कार्याध्यक्षा राखी जाधव यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. नव्याने संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या. यानुसार रुपेश खांडके (दक्षिण मुंबई ),सय्यद आरीफ अब्दुल सलाम(दक्षिण मध्य ),माजी आमदार मिलिंद उर्फ आण्णा कांबळे, (उत्तर मध्य ), अजित रावराणे (उत्तर पश्चिम ), विजयानंद शिरोडकर (उत्तर मुंबई ),धनंजय उर्फ दादा पिसाळ (ईशान्य) यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

हेही वाचा… पुरोगामी, डाव्या पक्षांची प्रागतिक पक्षाच्या झेंड्याखाली एकजूट

हेही वाचा… निधीवाटपावरून वाद सुरू झाले मंत्री व विरोधी पक्षनेते समोरासमोर

जिल्हाध्याक्षांची निवड केली असली तरी पक्षापुढे मुंबईत अनेक आव्हाने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत झाली असली तरी पक्षाची या शहरात म्हणावी तशी ताकद नाही. स्थापनेपासून ते अजित पवार यांच्या बंडखोरीपर्यत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुंबईत जम बसवणे जमले नाही. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते टिकवण्याचे फार मोठे आव्हान आहे. सत्तेच्या बळावर अजित पवार गट मुंबईत राष्ट्रवादीला फोडू शकतील. या आव्हानाचा सामना करताना मुंबई महापालिका निवडणुक अथवा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्षाचा पाया भक्कम करण्याचे दुसरे भरभक्कम आव्हान पेलावे लागणार आहे.या दुहेरी आव्हानाचा सामना राष्ट्रवादीला मुंबईत करावा लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai ncp faces dual challenges about party expansion print politics news asj
Show comments