नागपूर: विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कोमात गेलेली जिल्हा कॉंग्रेस अद्याप त्या अवस्थेतून बाहेर येण्यास तयार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे, काँग्रेसच्या नेमक्या याच स्थितीचा फायदा घेत भाजपने नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पाडणे सुरू केले आहे. .मागच्या आठवड्यात भाजपमध्ये झालेले काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांचे प्रवेश वरील बाब अधोरेखित करणारे ठरले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नागपूरला आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुका जिंकण्यासाठीसाम-दाम-दंड-भेद या तंत्राचा वापर करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत हे भाजपला जमले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी ते करून पूर्ण बहुमत मिळवले. मात्र आता पुढच्या पाच वर्षात लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका नाहीत. पण पुढच्या काही महिन्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत. भाजप हा वर्षभर निवडणूक मोडवर राहणारा पक्ष आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी त्यांनी आत्तापासून सुरू केली आहे. त्यासाठी ते साम-दाम दंड भेद याच तंत्राचा वापर करीत आहेत. जेथे महाविकास आघाडीचे नेते प्रभावी आहेत, त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला लावणे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. उमरेड तालुक्यात झालेले संरपंचाचे भाजप प्रवेश याच दिशेने टाकलेले पऊल आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

उमरेड तालुक्यात २२ सरपंचाचा भाजप प्रवेश

नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसह इतर पक्षाच्या २२ सरपंचांसह ,कार्यकर्त्यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नुकताच भाजप प्रवेश झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष हेच नागपूरचे पालकमत्री आहेत. त्यामुळे त्यांनी या पक्ष प्रवेशाची उत्तम प्रसिद्धी केली पक्ष प्रवेशामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना खिंडार पडल्याचा दावा भाजपने केला आहे . भाजपची सध्या सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घटनेचे भाजपने मार्केटिंग केले. ग्रामीण भागातील नेते व कार्यकर्त्यांचा कल सत्तेसोबत राहण्याचा आहे. ही बाब ओळखून विरोधी पक्षाचे सरपंच असलेल्या ग्रामपंचायती हेरून सरपंचाला निधी देण्याचे आमिष दाखवून पक्ष प्रवेश घडवून आणले जात असल्याची माहिती आहे.

काँग्रेसमधील मरगळ कारणीभूत

भाजप निवडणुकीवर लक्ष ठेवून पावले उचलत असताना दुसरीकडे म्हणजे जिल्हा काँग्रेसच्या पातळीवर यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही, किंवा इतरही तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते, नेते यांनी भाजपच्या गळाला लागू नये म्हणून एक साधी बैठकही घेतली नाही. जिल्हा काँग्रेस अजूनही गटबाजीतच अडकली आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यानी पक्षातील मरगळ दुर करण्यासाठी पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करणे सुरू केले आहे. पण अद्याप निरीक्षकांनी दौरेही झाले नाहीत. यासंदर्भात जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष बाबा आष्टनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा काँग्रेस शांतपणे बसली नाही, असे स्पष्ट केले. कुही तालुक्यातील काही सरपंच आणि कार्यकर्त्यांची स्थानिक आमदारांवर असलेली नाराजी यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना पक्षाशी नाराजी नव्हती, कार्यकर्थ्यांना त्यांची कामे करण्यासाठी सत्ता जवळची वाटते, ग्रामपंचायतीला विकास निधी हवा असतो, त्यासाठी भाजपकडून इतर पक्षाच्या सरंपंचाना भाजपमध्ये येण्याची अट घातली जाते. त्यातून असे पक्ष प्रवेश होत असतात., असे आष्टनकर म्हणाले.

असे असले तरी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमधली गटबाजी संपली नाही. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव ठेवून असलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांची कोंडी करण्याचे प्रयत्न पक्षातून अजूनही सुरू आहे. जिल्हा काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही, त्यामुळे एकूणच पक्षात निराशेचे वातावरण आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षात प्राण फुंकणारे नेतृत्व काँग्रेस इतक्या वर्षात निर्माण करू शकले नाही. त्याचा फटका पक्षाला सध्या बसत आहे. बड्या नेत्यांचे नागपुरात घरे आहेत, पण पक्ष वाढावा यासाठी ते दौरे करीत नाही, नागपुरात आले की माध्यम प्रतिनिधींशी चर्चा करायची ,दिवसभर टीव्हीवर झळकायचे हेच पक्ष कार्य असा समज नेत्यांनी करून घेतल्याने काँग्रेसचे जिल्ह्यात काय होणार अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

“ उमरेड तालुक्यातील काही सरपंच व कार्यकर्ते हे स्थानिक राजकारणामुळे पक्ष सोडून भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्याशी चर्चा करून निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती त्यांना केली होती. कार्यकर्त्यांचा कल सत्तेसोबत राहण्याचा आहे”

बाबा आष्टकर, जिल्हाअध्यक्ष काँग्रेस (प्रभारी)