नागपूर : भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले पण पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप नेते परिणय फुके यांना पुन्हा एकदा भाजपने विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. फुके यापूर्वी विधान परिषदेचे आमदार होते.

नागपूर महापालिकेचे सदस्य, भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अल्पकाळ राज्यमंत्री असा फुके यांचा राजकीय प्रवास आहे. फुके यांच्या राजकीय कारकीर्दीला नागपूर महापालिकेतून सुरूवात झाली. हिलटॉप प्रभागातून ते २००७ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. २०१४ मध्ये फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना फुके यांना विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली होती व तेथून त्यांनी या मतदारसंघातून दोन वेळा विजयी झालेले राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांचा पराभव केला होता.

हेही वाचा : कुणी म्हणे मोदींचे कान आणि डोळे, तर कुणी म्हणे ‘सुपर सीएम’; निवृत्त झालेल्या ‘या’ अधिकाऱ्याची एवढी चर्चा का?

२०१९ मध्ये फडणवीस यांनी फुके यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्याकडे वन,आदिवासी आणि सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले होते. २०१९ मध्ये फुके यांना साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. या निवडणुकीत फुके यांचा पराभव झाला होता. मात्र निराश न होता फुके यांनी भंडारा जिल्ह्यात आपला राजकीय पाया भक्कम करण्यास सुरूवात केली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणीही केली होती. पण पक्षाने तेथील विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिल्याने ते नाराज झाल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात होती.

हेही वाचा : १८ व्या लोकसभेला उपाध्यक्ष असणार; विरोधकांना पद देण्याची काँग्रेसची मागणी

मेंढे यांचा काँग्रेसच्या नवखा उमेदवाराने पराभव केल्याने फुके यांच्या भूमिकेवर पक्षातूनच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तर थेट फुके यांच्यावर त्यांनी महायुतीचे काम न केल्याचा आरोप केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत फुके पुन्हा साकोलीतून विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा असतानाच भाजपने त्यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.