चंद्रशेखर बोबडे
एका चतुर्वेदींनी स्वार्थासाठी नागपुरातील काँग्रेस संपवली. आता त्यांचेच पुत्र नागपुरातील उरलीसुरली शिवसेना संपवायला निघाले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून पक्षातील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली जात आहे.
ज्यात सध्या शिवसेनेतील फुटीचा मुद्दा गाजत आहे. शिवसेना की शिंदे गट? असा पेच शिवसैनिकांपुढे आहे. पण नागपुरात हा मुद्दा वादाचा नाही. कारण शिवसेनेची ताकदच मुळात अल्प आहे. चिंता आहे ती अस्तित्वात असलेली शिवसेना टिकवून ठेवण्याची. त्यावर आपलाच ताबा असावा असा निष्ठावंत गटाचा आग्रह आहे. मात्र काही वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या दुष्यंत चतुर्वेदी यांनी जुन्यांना डावलून आपल्या समर्थकांची महत्त्वाच्या पदांवर वर्णी लावणे सुरू केल्याने पक्षात जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू झाला आहे. अलीकडे चतुर्वेदी यांनी शहरप्रमुखपदावर आपल्या समर्थकांची नियुक्ती केल्याने एक गट नाराज झाला. चतुर्वेदी सेना संपवणार, अशी टीका सुरू झाली. या राजकीय टीकेमागची पार्श्वभूमी जाणून घेताना कोण आहेत हे चतुर्वेदी? समजणे आवश्यक ठरते.
हेही वाचा- विरोध केलेल्या आमदाराचे गोडवे गाण्याची भाजप नेत्यांवर वेळ
शिवसेनेतील दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र आहेत. त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध नव्हताच. पण अचानक ते यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून गेले. मूळचे नागपूरचे असल्याने पक्षाने त्यांना नागपूरचे संपर्कप्रमुख केले. त्यानंतर दुष्यंत यांनी वडिलांच्या काँग्रेसमधील समर्थकांना सेनेत आणून महत्त्वाच्या पदांवर नेमले. यामुळे कट्टर शिवसैनिक संतापले. दुष्यंत यांनी अलीकडेच प्रवीण बरडे यांची शहरप्रमुखपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी नितीन तिवारी या समर्थकाची नियुक्ती केली. विशेष म्हणजे बरडे यांची नियुक्ती केंद्रीय नेतृत्वाने केली होती. ती रद्द करण्याचे अधिकार संपर्क प्रमुखांना नाहीत, असा युक्तिवाद बरडे यांचा आहे. मात्र वरिष्ठांना विचारूनच संघटनेत फेरबदल केले, असा दुष्यंत यांचा दावा आहे.
या वादावर तोडगा काढण्यासाठी खासदार संजय राऊत आले. पण बरडे नागपूरबाहेर होते. यातून त्यांची नाराजी स्पष्ट होते. अशीच अन्याय झाल्याची भावना जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांची आहे. त्यांचाही राग पक्षात ‘बाहेरून’ आलेल्यांवरच आहे. चतुर्वेदी यांची कार्यशैली त्यांचे वडील सतीश चतुर्वेदी यांच्या पावलावर पाऊल टाकणारी आहे. नागपुरात काँग्रेस संपुष्टात आणण्यासाठी जी काही मोजकी मंडळी कारणीभूत आहेत त्यात चतुर्वेदी यांचे नाव अग्रस्थानी आहे. आता त्यांचे पुत्र पक्षात गटबाजी निर्माण करून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न करीत आहे, असे कट्टर शिवसैनिक सांगतात.