चंद्रशेखर बोबडे
नागपूर : नागपूर शिक्षक मतदार संघातील उमेदवारांची अधिक संख्या आणि रिंगणातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार लक्षात घेता निवडणुकीतील चुरस वाढली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांवर’ कोणताही उमेदवार विजयी होण्याची शक्यता धुसर असल्याने सर्वच उमेदवार दुस-या पसंतीच्या मतांची बेगमी करताना दिसत आहे. २०१७ च्या निवडणुकीत या मतदारसंघातील विद्यमान आमदार नागोराव गाणार यांचा विजयही दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे झाला होता हे येथे उल्लेखनीय आहे.
शिक्षक मतदार संघासाठी ३० जानेवारीला मतदान आहे.सहा जिल्ह्यातील एकूण ४० हजार मतदार असून तब्बल २२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत पसंतीक्रमा नुसार मतदान आणि मतमोजणी होते. एकूण वैध मतांच्या ५० टक्के मते विजयासाठी आवश्यक असतात. त्यासाठी निश्चित केलेला कोटा उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनी पूर्ण करू शकला नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी होते. पहिल्या फेरीत सर्वात कमी मते घेणारा उमेदवार बाद होतो व त्यांच्या मतपत्रिकेवर दुसऱ्या पसंती क्रमाची मते ज्या उमेदवाराच्या नावे असेल ती त्याच्या एकूण मतांमध्ये अधिक केले जातात. यामुळे पसंतीक्रम मतदानाच्या पध्दतीत पहिल्या पसंती इतकेच दुसऱ्या व तिसऱ्या मतांना महत्त्व असते.
हेही वाचा… ‘लहान भाऊ ’ उद्धव ठाकरे ठरले आता विकास प्रकल्प रोखणारे ‘खलनायक’
नागपूरचा विचार केल्यास एकूण सरासरी ४० हजार मतदार आहेत. २०१७ मध्ये या निवडणुकीत ८०टक्के मतदान झाले होते. यावेळी सरासरी तेवढीच कायम राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ३० ते ३२ हजार मतदान अपेक्षित आहे. अवैध आणि नोटा आदी मते वजा करता १५ ते १६ हजार मतांचा कोटा विजयासाठी निश्चित केला जाऊ शकतो. इतकी मते पहिल्या पसंतीची मिळवणे कुठल्याही उमेदवाराला विश्वास वाटत नसल्याने सर्वांची मदार ही दुस-या पसंतीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा… क्षीरसागरांची जवळीक; मुंडे भगिनी अलिप्त, बीड भाजपात नवा राजकीय अध्याय
शिक्षक संघटना असो वा त्यांना समर्थन देणारे राजकीय पक्ष असो प्रत्येकांची मतपेढी ठरलेली आहे. ही मतपेढी म्हणजे संबधित उमैदवारांची पहिल्या पसंतीची मते मानली जाते. दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी उमेदवारी अनेक तडजोडी करतात प्रतिस्पर्धी पक्ष किंवा संघटना याबाबत परस्परांशी बोलणी करीत असल्याचे दिसून आले आहे. रिंगणात असलेल्या शिक्षक संघटनांचे उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांसोबत दुसरा पसंतीच्या मतांची बेगमी करीत आहे. या संदर्भात विद्यापीठ निवडणुकीतील दिग्गज व कॉंग्रेस नेते बबनराव तायवाडे म्हणाले, पसंतीक्रम मतदान पध्दतीत दुस-या, तिसऱ्या सर्वाच क्रमांच्या मतांना महत्त्व असते. कारण बाद फेरीत ही मते निर्णायक ठरतात.
वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार खोब्रागडे यांनीही पुरेशा प्रमाणात दुसऱ्या पसंतीची मते मिळाली तर निवडणुकीत चमत्कार घडण्याची शक्यता वर्तवली.