राजेश्वर ठाकरे
नागपूर : काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद विकोपाला जाऊन नेत्यांमध्ये वादावादी आणि हाणामारी सारख्या घटनांची परंपरा जुनी आहे. हीच परंपरा नवीन पिढीतील नेते शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांनी सार्वजनिक ठिकाणी समोरासमोर येऊन कायम ठेवल्याचे चित्र आहे.
गेल्या तीन-चार दशकात नागपूर शहर काँग्रेसमध्ये गटबाजी वाढीस लागली. तत्कालीन नेते दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांचे नेतृत्व पुढे आले. सोबतच राज्याच्या राजकारणात सतीश चतुर्वेदी यांनी ते मंत्रीपदावर असताना जम बसवला. पुढे हे दोन्ही नेते शहर काँग्रेसवर पकड मिळवण्यासाठी सतत एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करीत राहिले. परिणामी शहर काँग्रेस म्हटले की, मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदी असे ठळक दोन गट डोळ्यासमोर येत असत.
हेही वाचा… चंबळच्या खोऱ्यातील नरेंद्राचे राजकीय भवितव्य पणाला!
२०१७ च्या नागपूर महापालिका निवडणुकीत तर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोर उभे करणे, त्याला रसद पुरवण्यासारख्या पक्षविरोधी कारवाया केल्या जात होत्या. हा वाद प्रदेश काँग्रेसपर्यंत पोहचला होता. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी वाटपात मुत्तेमवार गटाला झुकते माप दिल्याचा संताप चतुर्वेदी गटाने चव्हाण यांच्यावर शाई फेकून व्यक्त केला होता. त्यानंतर चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून (फेब्रुवारी २०१८) बडतर्फ करण्यात आले होते. त्यांच्यावर बंडखोर उमेदवार उभे करण्यास प्रोत्साहन देणे, बंडखोरांचा प्रचार करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
हेही वाचा… राजस्थानच्या निवडणुकीत AIMIM ची उडी, तीन जागांसाठी उमेदवार जाहीर!
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची स्थिती जाणून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विभागीय आढावा बैठक बोलावली होती. यामध्ये पक्षाचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांनी बोलण्याची संधी मिळावी म्हणून शहर अध्यक्षांच्या हातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावरून ठाकरे आणि जिचकार यांच्यात प्रथम बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाली. हा वाद प्रदेश शिस्तपालन समितीकडे गेला असून जिचकार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी (एप्रिल २०१६) ठाकरे आणि जिचकार यांच्यात नागपूर विमानतळावर हाणामारी झाली होती. ठाकरे हे मुत्तेमवार यांचे विश्वासू आहेत तर जिचकार यांना शहर आणि ग्रामीणमधील काँग्रेस नेते व माजी मंत्र्यांचा छुपा पाठिंबा आहे.