नांदेड : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होण्याच्या बरोबर एक महिना आधी पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि दुसर्याच दिवशी त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारत या पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या नव्या राजकीय प्रवासास एक महिना पूर्ण झाला. नांदेडमध्ये भाजपने विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर – पाटील यांनाच उमेदवारी दिल्याने त्यांना निवडून आणण्याचे मोठे आव्हान अशोकरावांसमोर असेल.
भाजपात प्रवेश केल्यानंतर या पक्षाच्या दोन सर्वोच्च नेत्यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी बहाल केली. संसदेच्या या वरिष्ठ सभागृहासाठी ते बिनविरोध निवडले गेले. चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा ते या पक्षातर्फे नांदेडमधून लोकसभेचे उमेदवार होतील, असे सर्वांना वाटले, पण दुसऱ्या दिवशीच सारे काही स्पष्ट झाले. तत्पूर्वी त्यांनी नांदेडमधून आवश्यक ती प्रमाणपत्रे संबंधित यंत्रणांकडून मिळवली, तरी त्याची कुणकुण कोणालाही लागली नाही. चव्हाण यांनी स्वतःच्या सुरक्षित आणि सन्मानजनक पुनर्वसनासह भाजपा प्रवेश केला, पण आता या पक्षाच्या ताब्यात असलेली नांदेड लोकसभेची जागा चांगल्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. गेल्या महिनाभरात चव्हाण यांच्या राजकीय निर्णयावर जिल्ह्यात, विशेषतः ग्रामीण भागातली लोकभावना, मनोज जरांगे पाटील समर्थकांकडून येणार्या प्रतिक्रिया लक्षात घेता प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान चव्हाणांवरील ताण वाढेल, असे दिसते.
हेही वाचा : चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद शिगेला
चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर नांदेड शहर तसेच भोकर मतदारसंघातील त्यांच्या अनेक समर्थकांनी त्यांच्या हातून भाजपाची उपरणे गळ्यात घालून घेतली, तरी त्यांतील बहुतेक सर्वाचा अधिकृत पक्षप्रवेश अजून झालाच नाही. भाजपात वरचढ झालेल्या पदाधिकार्यांनी चव्हाणांसोबतचे अमर राजूरकर वगळता इतरांना अजिबात महत्त्व दिलेले नाही, असे गेल्या महिनाभरात दिसले.
गेल्या महिन्याच्या अखेरीस भाजपाचे दोन निरीक्षक येथे आले होते. त्यांच्या व्यक्तिगत भेटीसाठी पक्षाकडून निश्चित झालेल्या नावांमध्ये राजूरकर वगळता चव्हाणांच्या एकाही समर्थकाचा समावेश नव्हता. मग त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे दाद मागितल्यावर काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांतील १०० कार्यकर्त्यांना गटागटाने निरीक्षकांना भेटण्याची संधी मिळाली, पण काँग्रेसमध्ये असताना या चव्हाण समर्थकांचा अशा प्रसंगांत जो रुबाब, जो सहज वावर असायचा, तो दिसला नाही. त्यांना सामान्य रांगेत थांबावे लागले. निरीक्षकांसमोर उभे राहून आपले उमेदवारासंबंधीचे मत त्यांना मांडावे लागले. थोडक्यात सांगायचे तर भाजपातील स्थानिकांनी चव्हाणांचा सन्मानपूर्वक स्वीकार केला, पण त्यांच्या खास समर्थकांना पहिल्याच प्रसंगात गारद केल्याचे दिसले.
हेही वाचा : काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! पहिल्या समन्वय बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय
भाजपा प्रवेशानंतर चव्हाण यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिल्लीतील बैठकीत पक्षाचा भावी खासदार या नात्याने हजेरी लावली. त्यानंतर नांदेडमध्ये झालेल्या एका बैठकीत प्रत्यक्ष तर एका बैठकीत त्यांनी दूरदृश्यप्रणालीतून सहभाग नोंदवताना आपल्या सूक्ष्म व्यवस्थापन कौशल्याचा परिचय इतरांना दिला. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून इतर प्रमुख नेत्यांशी त्यांचा प्रसंगोपात संवाद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नांदेड विमानतळावर प्रत्यक्ष भेटण्याची तर गृहमंत्री अमित शहा यांना छत्रपती संभाजीनगरातील जाहीर सभेत व्यासपीठावर भेटण्याची-बोलण्याची संधी त्यांना मिळाली.
हेही वाचा : बंगालमध्येही ‘ताई-दादा’ आमनेसामने; कोण आहेत बाबून बॅनर्जी?
गेल्या लोकसभा निवडणुकीत चिखलीकर-पाटील यांनीच अशोक चव्हाण यांचा नांदेडमध्ये पराभव केला होता. भाजपने चिखलीकर यांना ताकदही दिली होती. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे उमेदवारी अशोकरावांच्या समर्थकांना मिळणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण भाजपने चिखलीकर यांनाच उमेदवारी दिली. तसेच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी चिखलीकर यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान दिले होते. जिल्ह्यातील राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या चिखलीकर यांच्या विजयासाठी अशोकरावांना प्रयत्न करावे लागतील. चिखलीकरण यांचा पराभव झाल्यास त्याचे खापर अशोकरावांवर फुटू शकते. यामुळेच चव्हाण यांना ताकद लावावी लागेल.