नांदेड : भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची जागा कायम राखण्यासाठी पक्षाला नांदेडमधून राज्यसभेच्या दोन जागांची गुंतवणूक करावी लागल्यानंतर आता नांदेड लोकसभेच्या लढतीसाठी हा पक्ष सज्ज होत असून या निवडणुकीत चिखलीकर यांच्याऐवजी पक्षाचे नवनेते अशोक चव्हाण यांची कसोटी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाची स्थापना १९८० साली झाल्यानंतर पूर्वीच्या जनसंघातील कार्यकर्त्यांसोबत १९९० नंतर या पक्षाला जिल्ह्यात नवे कार्यकर्ते मिळत गेले; पण बाळासाहेब पांडे, चंद्रकांत मस्की, राम चौधरी, गणपत राऊत या जुन्या आणि नंतरच्या काळातील धनाजीराव देशमुख, प्रा. नंदू कुलकर्णी वा अन्य कोणाचाही पक्षाने विधान परिषद किंवा राज्यसभा सदस्यत्वासाठी कधीही विचार केला नाही. २०१८ साली माजी जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना पक्षाकडून विधान परिषदेवर घेण्यात आले. आता त्यांची मुदत संपता संपता पक्षाने गेल्या महिन्यात नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्यासह आपल्या परिवारातील डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून आणत लोकसभेपूर्वी जिल्ह्यात मोठी गुंतवणूक केली.

हेही वाचा : दीड वर्षे मेहनत करुन राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या पदरी निराशा

नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात होणार असली, तरी या निवडणुकीत काँग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांच्या नव्या राजकीय भूमिकेची कसोटी लागणार आहे. चिखलीकर यांच्या उमेदवारीची पंधरवड्यापूर्वी पक्षाकडून घोषणा झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासह काही इच्छुकांनी फडणवीस यांच्यासमोर खळखळ केली होती. पण माढा किंवा नगर येथे भाजपात जसा वाद निर्माण झाला, तसा नांदेडमध्ये झाला नाही.

मागील आठवडाभरात भाजपाने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती केली. पुढील टप्प्यात नायगाव आणि मुखेड येथे बैठका घेण्याचे निश्चित झाले असून चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. फडणवीस यांची चिखलीकर यांच्यावर असलेली खास मर्जी एव्हाना अशोक चव्हाण व त्यांच्या समर्थकांच्या लक्षात आली असून नांदेडची ही जागा राखण्यासाठी भाजपाने अन्यत्र कोठेही केली नाही. अशी गुंतवणूक नांदेडमध्ये केल्यानंतर पक्षाला अशोक चव्हाणांकडून मोठ्या परताव्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : मुरादाबादमध्ये सपाकडून दोन दिवसांत दोन अर्ज; रामपूरमध्ये उमेदवार जाहीर, आणखी एका दावेदाराने वाढवला तणाव

लोकसभेच्या मागील निवडणुकीत नांदेडमध्ये चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी नांदेडमधील चव्हाण समर्थक मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक तयारी करत होते. पण फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात अत्यंत अनपेक्षित घडामोडीत चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष, या पक्षाची आमदारकी सोडून दुसर्या दिवशी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आठवडाभरात ते या पक्षातर्फे राज्यसभेवर बिनविरोध गेले. आता ते आणि त्यांचे समर्थक नांदेडमधून पक्षाला आणखी एक खासदार देण्यासाठी झटत असले, तरी चिखलीकर यांच्यावर वेगवेगळ्या कारणांनी नाराज असलेल्यांची मनधरणी चव्हाण आणि खतगावकर या दोघांनाही करावी लागत आहे.

हेही वाचा : काँग्रेसचे १६ हजार नेते-कार्यकर्ते भाजपात! काय चाललंय मध्य प्रदेशात?

काँग्रेस पक्षानेही मागील काळात नांदेडमधून काही नेत्यांना राज्यसभेवर घेतले होते, पण या पक्षाकडून एकाच निवडणुकीत नांदेडमधून दोघांना कधीच संधी मिळाली नव्हती. ती नोंद आता भाजपाच्या नावावर झाली आहे. त्याचवेळी हा पक्ष एखाद्याला पावतो तसा त्यांच्या स्पर्धकाला उपेक्षित ठेवतो, हेही बघायला मिळाले. सूर्यकांता पाटील, डॉ. माधव किन्हाळकर यांना भाजपात येऊन १० वर्षे उलटली, पण त्यांचे सन्मानजक पुनर्वसन अजूनही झालेले नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nanded challenge for ashok chavan to get victory for bjp nanded loksabha candidate pratap chikhalikar print politics news css