नांदेड : नांदेडच्या राजकीय भूमीवरील ‘अशोक’वनात ‘प्रताप’गडाची पायाभरणी करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुढील काळात मंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असे येथे सूचित केले. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे आणि त्यांचे शेकडो समर्थक तसेच नाईक घराण्याशी संबंधित याच पक्षाच्या माजी जि.प.अध्यक्ष वैशाली चव्हाण, वादग्रस्त माजी नगरसेवक गफार खान यांच्या ‘राष्ट्रवादी’तील पक्षप्रवेशानिमित्त आ.चिखलीकर यांच्या पुढाकारातून शुक्रवारी झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना पक्ष बळकट करण्याची तसेच पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगला निकाल देण्याची अट घालत तुमच्या मनामध्ये जे आहे, ते होईल असे पवार यांनी भाषणाच्या शेवटी जाहीर केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.
गेल्या ३४ वर्षांत सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो, वेगवेगळ्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये येणे झाले, पण आज या पवित्र भूमीत झालेले उत्स्फूर्त स्वागत आणि उष्णता वाढत चाललेली असतानाही कार्यकर्त्यांचा उत्साह यापूर्वी कधी अनुभवला नव्हता, असे प्रारंभीच नमूद करून पवार यांनी मोहन हंबर्डे राष्ट्रवादी परिवारात दाखल झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रताप पाटील चिखलीकर सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा नेता असल्याची प्रशस्ती देतानाच आता आणि पुढील काळात घड्याळासोबतच रहा, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी दिला.
मागील काही महिन्यांत चिखलीकर यांनी जिल्ह्यामध्ये ‘राष्ट्रवादी’च्या विस्ताराचे पाऊल टाकत भाजपाच्या स्थानिक नेत्यांची डोकेदुखी वाढविली आहे. पक्ष विस्ताराच्या त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी अजित पवारांसह पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक तसेच अन्य आजी-माजी आमदार येथे आले होते. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमामध्ये पवार काय घोषणा करतात, याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते.
मागील दोन दशकांत वेगवेगळ्या कालखंडात दोनदा आमदार झालेल्या चिखलीकर यांची आमदारकीची तिसरी कारकीर्द सुरू झाली आहे. मधल्या काळात ते भाजपाचे खासदारही होेते. प्रदीर्घ अनुभवाच्या शिदोरीवर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे, अशी त्यांच्या समर्थकांची भावना असली, तरी पवारांच्या शुक्रवारच्या दौर्यात तशी मागणी करण्याचे धाडस कोणीही केले नाही. पण अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळातील काही सदस्यांच्या जागी अन्य आमदारांना संधी देण्याचा मनोदय असल्याचे पवार यांनी येथे स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये पक्ष बळकट करतानाच चांगला निकालही दिला तर तुमच्या मनामध्ये जे आहे, ते होईल. अशा शब्दांत त्यांनी चिखलीकरांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले.
नांदेड जिल्ह्यात सर्व ९ जागांवर महायुतीचेच आमदार असून त्यांत भाजपाचे ५, शिवसेनेचे ३ तर राष्ट्रवादीकडून चिखलीकर हे एकमेव आमदार आहेत. भाजपा व शिवसेनेने मंत्रिमंडळात जिल्ह्यातून कोणालाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले नाही. राष्ट्रवादीनेही तोच कित्ता गिरवला. पण नांदेड जिल्ह्यात भाजपाला आव्हान द्यायचे असेल, तर चिखलीकरांना सत्तापद देण्याची गरज असल्याची लोकभावना आहे. पवार यांनी या लोकभावनेची प्रथमच नोंद घेतल्याचे शुक्रवारी दिसून आले.
नांदेड (द.)चे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यावर त्यांच्या पूर्वीच्या पक्षात अन्याय झाला. ते ज्या पक्षात होते तिथे त्यांनी निष्ठेने काम केले, तरी त्यांच्याबद्दल वरिष्ठांची दिशाभूल करण्यात आली. पण आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला आहात, निश्चिंत राहा, मी आपल्या सर्वांच्या पाठिशी असून कोणतीही शंका मनात बाळगू नका, अशा शब्दांत अजित पवार यांनी हंबर्डे व त्यांच्या समर्थकांना आश्वस्त केले.