नांदेड: राज्यातील काही मतदारसंघांमध्ये वडील वि. मुलगी, काका विरूद्ध पुतण्या, भाऊ विरूद्ध बहीण अशा लढती समोर आलेल्या असतानाच लोहा मतदारसंघात शेकापच्या उमेदवारीवरून आमदार श्यामसुंदर शिंदे आणि त्यांच्या पत्नी आशा यांच्यातच स्पर्धा लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंधार आणि लोहा या दोन तालुक्यांत विभागलेल्या मन्याड खोर्‍यातील या मतदारसंघावर केशवराव धोंडगे यांच्या माध्यमातून ‘शेकापच्या खटार्‍याची’ दीर्घकाळ चलती राहिली. १९९५ साली धोंडगे पराभूत झाल्यानंतर या मतदारसंघाने पुढची २४ वर्षे वेगवेगळ्या पक्षांचे आमदार पाहिले, पण २०१९ मध्ये तेथे शिंदे यांनी पुन्हा शेकापचा झेंडा फडकवला.

हे ही वाचा… भाजपमध्ये दोन तर महाविकास आघाडीत एका जागेचा तिढा, काँग्रेसकडून दोन जुन्या तर दोन नवीन चेहऱ्यांना संधी

शिंदे हे या भागाचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेव्हणे असून मागील काही वर्षांत या दोन कुटुंबांदरम्यान आधी दुरावा निर्माण झाला. मग त्यांच्यातील वैमनस्य अनेक प्रसंगांमध्ये सार्वजनिक झाले. आता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दुसरीकडे शिंदे परिवारात पती का पत्नी, असा पेच निर्माण झाला आहे.

आ.शिंदे यांनी आधी अजित पवार यांच्या माध्यमातून आपली जागा सुरक्षित राखण्याचा प्रयत्न केला होता. दुसर्‍या बाजूला त्यांच्या पत्नी आशा शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष.शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. त्यातून शिंदे दाम्पत्यातील बेबनावही दिसून आला.

महाविकास आघाडीमध्ये शेकापचा समावेश असला, तरी आघाडीच्या जागा वाटपादरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाने लोहा मतदारसंघात एकनाथ पवार यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना ‘ए.बी. फॉर्म’ देऊन टाकला. त्यानंतर एकनाथ पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला अर्जही दाखल केला. महायुतीतून अजित पवार यांनी चिखलीकर यांना पसंती दिल्यामुळे आता शिंदे दाम्पत्याची कोंडी झाली आहे.

मागील काही दिवसांपासून शिंदे पती-पत्नी यांच्यातच उमेदवार होण्यावरून स्पर्धा लागली आहे. शेकापने त्यांना उमेदवारी देण्याची तयार दर्शविली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आशा शिंदे यांनी शिवसेनेच्या कृतीवर नापसंती व्यक्त करत आम्ही दोघेही अर्ज भरणार आहोत, असे शनिवारी स्पष्ट केले. दोघांतून कोणाचा अर्ज कायम ठेवायचा, याचा निर्णय ४ तारखेपूर्वी घेऊ असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nanded district loha assembly constituency competition among mla shyamsundar shinde and his wife asha shinde for candidatureprint politis news asj