नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीसाठी डॉ.मीनल पाटील खतगावकर यांचे नाव अचानक समोर आल्यानंतर पक्षातील अन्य इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विशेषत: विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, या विषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशास पुढील आठवड्यात एक महिना पूर्ण होईल. या अल्पावधीत त्यांनी स्थानिक भाजपातील चित्र बदलून टाकले. काँग्रेसमध्ये लोकसभेचा उमेदवार ठरविण्याची बाब त्यांच्या अधिकारकक्षेत होती, पण भाजपातही आता तसेच झाले असून त्यांच्या गटाने डॉ.मीनल पाटील यांचे नाव प्रथम पक्षाच्या निरीक्षकांसमोर ठेवले. नंतर ते वरच्या पातळीवर गेल्यानंतर पक्षाच्या उमदेवारीबाबत आतापर्यंत निश्चिंत असलेल्या खा.प्रताप पाटील चिखलीकर यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा : पडझडीनंतर मराठवाड्यातील काँग्रेसमध्ये सामसूमच!

अशोक चव्हाण भाजपात येण्यापूर्वी या पक्षातील तीन स्थानिक आमदार व अन्य दोघांच्या गटाने खा.चिखलीकर यांच्याएवेजी कोणालाही उमेदवारी द्या, अशी भूमिका पक्ष नेत्यांसमोर मांडली होती. या गटाने डॉ.संतुक हंबर्डे आणि राम पाटील रातोळीकर यांचे नावही समोर केले, पण अशोक चव्हाण गटाकडून डॉ.मीनल पाटील यांची शिफारस झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांत भाजपातील वरील इच्छुकांची धावाधाव सुरू झाली.

डॉ.संतुक हंबर्डे तीन दिवसांपूर्वी नांदेडबाहेर पडले. पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांशी त्यांनी आपल्या उमेदवारीसंदर्भाने संपर्क साधला. अशीच जुळवाजुळव करत आ.राम पाटील रातोळीकर गुरुवारी मुंबईमध्ये पोहोचले. त्याआधी खा.चिखलीकर यांनी छ.संभाजीनगर गाठून गृहमंत्री अमित शाह यांची भेट आणि पाठीवर थाप घेतली. तेथून ते नांदेडमध्ये आले आणि पुन्हा तिकिटाच्या मोहीमेवर मुंबईला रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : तब्बल २५ वर्षांनंतर मनोमिलन; विदेशातील नोकरी सोडून ‘तो’ आला बीजेडीमध्ये!

खासदार चिखलीकर यांच्या उमेदवारीची सारी भिस्त फडणवीस यांच्यावर आहे. दुसरीकडे आ.रातोळीकर व डॉ.हंबर्डे हेही शेवटचा एक प्रयत्न म्हणून मुंबईमध्ये पक्षनेत्यांच्या संपर्कात आहेत. डॉ.मीनल पाटील खतगावकर यांच्या नावाची बुधवारपासून जोरदार चर्चा सुरू झाल्यामुळे नांदेडमध्ये भाजपाकडून प्रथमच महिला उमेदवाराचा प्रयोग केला जाण्याची शक्यता वाढली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nanded will bjp sitting mp pratap chikhalikar get candidature of lok sabha election 2024 again print politics news css