नीलेश पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदुरबार : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नंदुरबार जिल्ह्याचा आढावा घेऊनही स्थानिक पातळीवर पक्षातील मरगळ कायम राहिल्याने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्षापुढे तयारी कशी करावी, याचे संकट आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये पक्षाची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट होत असतांना जिल्ह्यातील नेतृत्वही निष्क्रिय झाल्याने नंदुरबारमध्ये काँग्रेसला तारणार कोण, असा प्रश्न कार्यकर्त्यांना आहे.

सातपुडा पर्वतराजीत वसलेला नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे. कधीकाळी काँग्रेस पक्ष नेतृत्वासाठी या जिल्ह्याचे वेगळे महत्व होते. अनेकदा काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ या भागात फोडण्यात येत असे. अशा महत्वाच्या जिल्ह्यात पक्षाची दयनीय स्थिती झाली आहे. संघटनात्मक पातळीवरील वाताहत बघता नव्याने मोट बांधण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज कार्यकर्ते व्यक्त करतात. अनेक महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे पद रिक्त आहे. नवापूरचे आमदार शिरीष नाईक यांच्याकडे पदभार देऊन पक्षाचा कारभार हाकलला जात आहे. दिवंगत नेते माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या रुपाने तब्बल आठ वेळा नंदुरबार लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने बाजी मारली होती. गेल्या काही वर्षात पक्षाला उतरती कळा लागली. या काळात जिल्ह्याला आणि पक्ष नेतृत्वाला दिशादर्शक ठरेल, असे नेतृत्व पुढे आले नाही.

हेही वाचा… ‘शिवमहापुराण क‍थे’तून अमरावतीत राणा दाम्‍पत्‍याचा मतांचा जोगवा

सध्या जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार असून माजी आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्याबाबत कार्यकर्त्यांसह मतदार संघातील नागरिकांमध्ये असमाधान आहे. नंदुरबारमध्ये कमी आणि मुंबईतच जास्त वास्तव्य असलेले पाडवी चक्रव्युहात अडकलेल्या काँग्रेसला कसे तारतील, याबाबत अनेकांकडून साशंंकता व्यक्त केली जाते. आमदार शिरीष नाईक यांच्याकडे जिल्ह्याध्यक्षपदाची काही काळापासून धुरा असूनही जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये नव्याने जोष भरण्यात त्यांना अजूनही यश आलेले नाही.

हेही वाचा… संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे ?

नंदुरबार जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. भाजपच्या कारभारावर अंकुश ठेवण्यात वा त्यांची कार्यपध्दती नागरिकांसमोर मांडण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघही भाजपच्या ताब्यात आहे. खासदार डॉ. हिना गावित पाच वर्षे मतदार संघात खिंड लढवत असताना काँग्रेसकडून खासदारकीसाठी प्रबळ उमेदवार शोधताना कालापव्यय केला जातो. पाच इच्छुकांमधून एक नाव निश्चित करण्यात पक्षाला बराच विचार करावा लागतो. या कार्यशैलीमुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अकस्मात पुढे येणारे नाव कितपत प्रभावी ठरेल, याबद्दल कार्यकर्ते साशंकता व्यक्त करतात. कधीकाळी संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषदेत अन्य पक्षांना अत्यल्प स्थान होते. मागील काही वर्षात अत्यल्प स्थान असणाऱ्या भाजपने वेगाने जिल्ह्यात आपली पकड घट्ट करीत तळागाळापर्यंत पाळेमुळे विस्तारली. दुसरीकडे सक्षम नेतृत्वाअभावी स्वत:च्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसची वाताहत होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… कोकणातील जलविद्युत प्रकल्पाला पाणी देण्यास कोल्हापुरातील सर्वपक्षीयांचा विरोध

काही महिन्यांपासून प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष नाईक यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध भागात काँग्रेसने मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अतिशय जोमाने काम करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून ते निश्चितपणे दिसून येईल. आमदार के. सी. पाडवी यांनीही आजारपणातून बरे झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. शहाद्यातील युवक काँग्रेस आणि अन्य भागातील पदाधिकारी सक्रियपणे काम करीत आहेत. बुथ समित्यांचे नियोजन प्रगतीपथावर आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल. लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस झाली आहे. भाजप सरकारने आदिवासी बांधवांच्या विरोधात अनेक निर्णय घेतले. त्यामुळे भाजपतर्फे आयोजित डिलिस्टिंग मेळाव्याला अपेक्षित गर्दी होऊ शकली नाही. – दिलीप नाईक (कार्याध्यक्ष, काँग्रेस, नंदुरबार)