नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघात भाजपमधून आलेले राजेंद्र गावित यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज इच्छुकांनी या उमेदवारीचा फेरविचार न झाल्यास सांगली प्रारुप वापरण्याचा इशारा पक्षश्रेष्ठींना दिला आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेससाठी सोडण्यात आले आहेत. जिल्ह्यात काँग्रेससाठी चांगले दिवस आल्याने इतर पक्षांमधून येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. निवडणूकीच्या तोंडावर भाजपचा राजीनामा दिलेले राजेंद्र गावित यांना शहादा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षातंर्गत कलह सुरु झाला आहे. राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीविरोधात काँग्रेसचे माजी आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सीमा वळवी-नाईक, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, झेलसिंग पावरा यांनी दंड थोपटले आहेत. गावित यांचा काँग्रेस प्रवेश झाला नसतानाही त्यांना उमेदवारी कशी जाहीर झाली, असा प्रश्न सुहास नाईक यांनी उपस्थित केला आहे. विरोधाला न जुमानता गावित यांची उमेदवारी कायम ठेवल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा सर्व इच्छुकांनी दिला. निवडणूका आल्या की, गावित हे पक्ष बदलतात. त्यामुळे अशा माणसाला उमेदवारी देवून एक प्रकारे काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप सीमा वळवी यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गावित हे भाजपच्या विचारांचे असून त्याचे बंधू भाजपचे मंत्री असताना त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळतेच कशी, असा प्रश्न मोहन शेवाळेंनी उपस्थित केला. गावित यांच्यावर आम्ही बहिष्कार घालणार, त्यांना गावबंदी करणार, असा इशाराही त्यांनी दिला. माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी तर, गावित यांनी काँग्रेसची उमेदवारी पैसे देवून खरेदी केल्याचा आरोप केला. गावित यांचेच कार्यकर्ते हे के. सी. पाडवी यांना जमीन विकून तीन कोटी दिल्याचा दावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपांबाबत के. सी. पाडवी यांनाही माहिती दिली. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केल्याचे पाडवी यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nandurbar district shahada assembly aspirants in congress are angry because of the candidature of rajendra gavit print politics news asj