नंदुरबार : नंदुरबारमध्ये खासदार डॉ. हिना गावित यांना महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटातून विरोध होत असतानाच भाजमधूनही विरोधातील सूर आळवला जात असून उमेदवारीसाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केल्याचे चित्र आहे. नंदुरबारमध्ये पक्ष निरीक्षकांनी बंद दाराआड कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यात अनेक इच्छुकांची नावे पुढे आल्याने निरीक्षकांच्याही भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजपबरोबर सत्तेत असलेल्या नंदुरबारमधील शिंदे गटाचा खासदार डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीला विरोध आहे. अशातच भाजपच्या दोन निरीक्षकांनी नंदुरबारमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यातही खासदार गावित यांच्याविरोधातील सूर उघड झाल्याचे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपचे माजी मंत्री बाळासाहेब भेगडे आणि माजी मंत्री अशोक उईके यांनी नंदुरबार विश्रामगृहात जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बंद दरवाजाआड चर्चा केली. दिवसभरात ८० हून अधिक पदाधिकाऱ्यांशी लोकसभा उमेदवारीवरुन संवाद साधण्यात आला. यावेळी लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या काहींनी निरीक्षकांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यात स्वत: खासदार डॉ. गावित, त्यांचे काका राजेंद्र गावित, तळोदा- शहाद्याचे आमदार राजेश पाडवी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुहास नटावदकर यांच्या कन्या समिधा नटावदकर, डॉ. विशाल वळवी यांचा समावेश होता.

हेही वाचा : रायगडवरून अजित पवार – तटकरे आक्रमक, भाजपला सुनावले

या भेटीगाठींविषयी पक्षनिरीक्षकांनी अधिकृत प्रतिक्रिया देणे टाळले. बंद दाराआडामागील चर्चा पदाधिकाऱ्यांमार्फतच बाहेर आल्याने विद्यमान खासदारांविरोधातील खदखदही बाहेर आली. विशेष म्हणजे निरीक्षकांचे भेट घेतलेल्या इच्छुकांमध्ये खासदारांचे काका राजेंद्र गावित यांचेही नाव असल्याने उमेदवारीसाठी काका-पुतणी यांच्यात टक्कर होण्याची चर्चा आहे.

हेही वाचा : जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच

“विकासाची अनेक कामे दहा वर्षात केली आहेत. अनेक इच्छुक भाजपकडून निवडणूक लढण्यास तयार आहेत. मात्र मागच्या काळात मतदारसंघातील लोकांशी जोडलेली नाळ, संपर्क आणि केलेली विकास कामे पाहता मला उमेदवारी मिळेल ही आशा आहे. महायुतीमधील सर्व घटक पक्षांचा देखील आशीर्वाद लाभेल”, असे नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nandurbar eknath shinde shivsena bjp local leaders oppose candidature of dr heena gavit for lok sabha 2024 print politics news css