नंदुरबार : जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री पदमाकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला अजून एक धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नंदुरबारमध्ये असतानाच मंगळवारी वळवी यांनी मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदमाकर वळवी हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास राज्यमंत्री तसेच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री देखील राहिले आहेत. मंत्रिपद मिळूनही त्यांचा कार्यकाल उल्लेखनीय राहिला नाही. त्यांच्या कन्या सीमा वळवी यांनी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपददेखील भूषविले आहे. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पदमाकर वळवी हे शहादा- तळोदा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराकडून पराभूत झाले आहेत. वळवी यांचे नाव २००२ मध्ये अधिक चर्चेत आले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी आणलल्या अविश्वास प्रस्तावावेळी वळवी यांचे अपहरण केले गेल्याचा आरोप झाला होता. पाच ते १२ जून या कालावधीत त्यांना मातोश्री क्लबवर ठेवण्यात आले होते. त्यावेळच्या नाट्यमय घडामोडींमुळे वळवी यांचे नाव गाजले होते.

हेही वाचा : ठाण्याचे आमदार संजय केळकर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर का संतापले ?

नंदुरबार जिल्ह्यात गावित परिवाराचे वर्चस्व वाढले असताना त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून पुन्हा प्रबळ लढा देण्याच्या प्रयत्नांना वळवी यांच्या भाजपमध्ये जाण्याने काहीशी खीळ बसण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या रुपाने गांधी घराण्यातील व्यक्ती कित्येक वर्षांनी नंदुरबारमध्ये आली असतानाच वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेणे, हा निश्चितच योगायोग नसल्याचे मानले जात आहे. वळवी यांच्या जाण्याने काँग्रेसचे कितपत नुकसान होईल, याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. राहुल गांधी यांच्या नंदुरबारमधील जाहीर सभेस मिळालेल्या प्रतिसादामुळे काँग्रेस नेत्यांचा उत्साह वाढला असल्याने वळवी हे भाजपमध्ये जाण्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार डाॅ. हिना गावित यांच्या विरोधात भाजपसह शिंदे गटात असलेली नाराजी, भारत जोडो न्याय यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह, या काँग्रेससाठी अनुकूल बाबी मानल्या जात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nandurbar what is the loss of congress after padmakar valvi joins bjp print politics news css