नाशिक : राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि रोड शो भव्यदिव्य करण्यासाठी चाललेल्या जय्यत तयारीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर असले तरी यात राष्ट्रवादी अजित पवार गट काहीसा अलिप्त आहे. शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ वगळता या गटाचे मंत्री, आमदार व अन्य पदाधिकारी अनुपस्थित राहिले. परंतु, या बैठकीचे निमंत्रण आम्हाला दिले गेले नव्हते, असे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महोत्सवात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी आपण संपर्कात आहोत. महायुतीतीतील तिन्ही प्रमुख पक्ष आणि अन्य मित्रपक्षांच्या समन्वयाने पंतप्रधानांची सभा ऐतिहासिक केली जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
शहरात १२ ते १६ जानेवारी या कालावधीत आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गिरीश महाजन हे नाशिकला तळ ठोकून तयारीवर लक्ष ठेवून आहेत. महोत्सवाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती कार्यरत आहे. या समितीच्या बैठका झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकला दाखल होऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला होता. स्थानिक पातळीवर नियोजनासाठी २० उपसमित्या काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदा नाशिक दौऱ्यावर आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी युवा महोत्सवाची माहिती देऊन नाशिककरांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांची जाहीर सभा व रोड शो दिमाखदार करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसली असताना राष्ट्रवादी अजित पवार गट फारसा सक्रिय नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरे गटावर अपात्रतेची कारवाई टाळण्यामागे राजकीय खेळी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत एक लाख युवकांना सहभागी करण्याचे नियोजन आहे. प्रशासनाने त्यासाठी महाविद्यालयीन प्राचार्यांची बैठक घेतली. असे असले तरी या कार्यक्रमास अभूतपूर्व गर्दी व्हावी, याची जास्त जबाबदारी महायुतीवर असल्याची जाणीव शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करून द्यावी लागली. उद्घाटन सोहळ्यास किमान एक लाख युवकांची उपस्थिती आणि रोड शो, सभा शिस्तबध्दपणे पार पाडणे, या मुख्य जबाबदाऱ्या आपल्या सर्वांवर असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी तपोवनातील मैदानाची क्षमता अंदाजे दीड लाख असल्याने सर्व नागरिकांना सभा खुली असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभा मंडपात पुढील निम्मी जागा युवकांसाठी राखीव ठेवावी. मागील जागा इतरांसाठी ठेवण्यावर चर्चा झाली. गर्दी जमविण्याची मुख्य भिस्त शहरातील लोकप्रतिनिधी आणि पक्षीय पदाधिकाऱ्यांवर आहे. ग्रामीण भागातूनही रसद मिळवली जाईल. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर संबंधितांच्या वाहनांसाठी तळाची व्यवस्था केली जाईल. तेथून त्यांना सिटीलिंक बसने कार्यक्रमस्थळी नेले जाणार आहे. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी, सर्वांनी जबाबदारी घेण्यास पुढे यावे, असे आवाहन केले.
हेही वाचा : काँग्रेस आणि विरोधकांच्या यशापयशाची मालिका खंडित होणार का ?
भाजप-,शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या असल्या तरी सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ वगळता कुणी उपस्थित नव्हते. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण मिळाले नव्हते, असे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी युवकचे काही पदाधिकारी त्या बैठकीत सहभागी झाले होते. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्रपणे बैठक घेतली जाणार असल्याचे ॲड. पगार यांनी नमूद केले. या घटनाक्रमाने शिंदे गट-राष्ट्रवादीतील शीतयुध्दाची चर्चा होत आहे. भाजपच्या नेत्यांनी मात्र त्यात तथ्य नसल्याचा दावा केला.
हेही वाचा : भाजप अन् RSSच्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यास काँग्रेसचा नकार; ममता अन् मायावतींची भूमिका काय?
“पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणारी नाशिकची सभा महायुतीला ऐतिहासिक करायची आहे. महायुतीतील सर्व पक्षात समन्वय असून सर्व मिळून सभा यशस्वी करणार आहोत. यात कुठेही मत-मतांतरे वा वाद-विवाद नाहीत. छगन भुजबळ हे ओबीसी संघटनांच्या कार्यक्रमात अडकले आहेत. परंतु, आपण त्यांच्याशी संपर्कात आहोत. महोत्सवाच्या उद्घाटनास अजित पवार स्वत: येणार आहेत.” – गिरीश महाजन (भाजप नेते तथा ग्रामविकासमंत्री)