नाशिक : राज्यातील दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आल्यावर इतर जिल्ह्यांप्रमाणेच नाशिकमध्येही काही तालुक्यांचा समावेश यादीत नसल्याने नाराजीचे सूर उमटले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने निषेधार्थ आंदोलनांचे सत्र चालू असताना नांदगाव तालुक्यात शिंदे गटाच्या आमदारानेच विरोधात दंड थोपटल्याने सत्ताधाऱ्यांची अडचण झाली आहे. दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असतानाही नांदगाव, देवळा, चांदवड, बागलाण या तालुक्यांना डावलण्यात आल्याचे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह विरोधकांचे म्हणणे आहे. अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचा येवला, याच गटाचे माणिक कोकाटे यांचा सिन्नर आणि शिंदे गटाचे दादा भुसे यांचा मालेगाव, या सत्ताधारी पक्षांशी संबंधित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील इतर दुष्काळग्रस्त तालुक्यांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कायमच दुष्काळाला तोंड देणाऱ्या नांदगाव तालुक्यात याविषयी अधिकच खदखद आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात याविषयीचा असंतोष व्यक्त झाला. अत्यल्प पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी , पशुपालक , व्यापारी आणि सर्वच मेटाकुटीला आले आहेत. आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांवर कायमच आक्रमक भूमिका घेणारे नांदगावचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर होण्याआधीच आपल्या तालुक्यात दुष्काळ जाहीर न झाल्यास सत्ताधारी पक्षाचे असूनही आव्हान देण्याची तयारी दर्शवली होती.
हेही वाचा : चंद्रशेखर राव यांचा पक्ष सोलापुरात तेलुगू भाषकांपुरताच मर्यादित ?
नांदगावमध्ये दुष्काळ जाहीर न झाल्याने संतप्त झालेल्या कांदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना यासंदर्भात आश्वस्त केल्याने सध्या कांदे हे शांत आहेत. परंतु, नांदगावमध्ये दुष्काळ जाहीर न झाल्यास कांदे काय करणार, याबद्दल तालुक्यातील विरोधकांनाही उत्सुकता आहे. नांदगाव दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उपोषण सुरु करण्यात आल्यानंतर जाग आलेल्या अजित पवार गटानेही आंदोलनाचा इशारा दिला.
हेही वाचा : ओबीसी संघटनाही करणार न्यायालयीन संघर्ष
देवळा, चांदवड, बागलाण या तालुक्यातही असंतोषाचा वणवा पसरला आहे. विशेष म्हणजे, राजकीय पक्षांनी याविषयी पुढाकार घेतल्यानंतर आता इतर संस्था, संघटनाही याविरोधातील लढ्यात उतरल्या आहेत. देवळा तालुका भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने उपोषण सुरु करण्यात आले आहे. त्याआधी तालुक्यात संघटनेतर्फे कलापथकाच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे डॉ. राहुल आहेर असून भाजप अद्याप या विषयावर गप्प आहे. याची संधी साधत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी देवळा येथे काँग्रेसकडूनही उपोषण करण्यात आले. महाविकास आघाडीतर्फे या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चांदवड येथे मोर्चाही काढण्यात आला.
हेही वाचा : बारामतीच्या रंगीत तालमीत अजित पवारांची सरशी
बागलाणमध्येही या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट अधिक आक्रमक झाला आहे. बागलाणमध्ये भाजपचे दिलीप बोरसे आमदार असणे, हेही त्यामागील एक कारण आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय चव्हाण आणि विद्यमान आमदार बोरसे यांचे विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रृत आहे. दुष्काळप्रश्नी होणाऱ्या आंदोलनांमुळे सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार आहे. कोणत्याही एका तालुक्यात पुन्हा दुष्काळ जाहीर केल्यास इतर तालुक्यांमधील असंतोष अधिक उफाळण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे.