नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील रिंगणात उतरलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्याविरुध्द दोन फौजदारी गुन्हे दाखल असून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल नाही. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संबंधित प्रकरणात न्यायालयात खासगी तक्रारीबाबतचा खटला आहे. तर अपक्ष उमेदवारी करणारे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांच्याविरुध्द कुठलाही गुन्हा दाखल नाही. प्रमुख राजकीय पक्ष आणि भाजपशी संबंधित उमेदवार शिक्षण संस्था चालक असून कोट्यवधींच्या मालमत्तेचे धनी आहेत.

या निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात राजकीय पक्षांनी मातब्बर शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली असून भाजपशी संबंधित काही अपक्षही रिंगणात आहेत. येवल्यातील जगदंबा एज्युकेशन सोसायटी आणि नाशिकच्या मातोश्री एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त असणारे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्याविरुध्द दोन गुन्हे दाखल आहेत. यातील एक गुन्हा नोकरीस असल्याचे भासवत बनावट हजेरी पुस्तक, पगार पत्रके बनवून ते खरे असल्याचे भासवून संगनमताने ठकबाजी केल्याप्रकरणाचा आहे. दुसरा येवला येथील सुभाषचंद्रजी पारख सहकारी पतसंस्थेत तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकांच्या अपहार व गैरव्यवहार प्रकरणात कार्यरत संचालक मंडळाने त्यांच्या कामकाजावर नियंत्रण न ठेवून संमती दिल्याचा दोषारोप आहे. या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यांनी सबळ पुराव्याअभावी आपले नाव वगळल्याचा उल्लेख दराडे यांनी शपथपत्रात केला आहे. दोन्ही खटले प्रलंबित आहेत. दराडे दाम्पत्याकडे सुमारे साडेतीन कोटींची चल संपत्ती आहे. या दाम्पत्याने स्वत: खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य तब्बल २३ कोटींच्या घरात आहे. याशिवाय वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेचे मूल्य साडेपाच कोटींच्या घरात आहे. त्यांच्यावर चार कोटींचे दायित्व आहे.

हेही वाचा… केरळमधील भाजपाचा ख्रिश्चन चेहरा मोदींच्या मंत्रिमंडळात; कोण आहेत जॉर्ज कुरियन?

शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मविप्र शिक्षण संस्थेचे संचालक संदीप गुळवेंना मैदानात उतरविले आहे. गुळवे कुटुंबाची महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ म्हणून शैक्षणिक संस्थाही आहे. गुळवे यांच्याविरुध्द कुठलाही फौजदारी गुन्हा नाही. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संबंधित प्रकरणात फसवणूक, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये न्यायालयात खासगी तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार न्यायालयाने रद्दबातल ठरवली. त्यावर पुनर्विचार याचिका दाखल असून तिचे कामकाज प्रलंबित असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. या दाम्पत्याकडे सुमारे पाच कोटींची चल संपत्ती आहे. तर त्यांच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य सुमारे ३९ कोटी रुपये आहे. यात स्वत: खरेदी केलेल्या मालमत्तेचे मूल्य १७ कोटींच्या जवळपास तर वारसाप्राप्त मालमत्तेचे मूल्य २१ कोटींहून अधिक आहे.

हेही वाचा… पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील स्त्रीशक्ती; मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ‘त्या’ सात महिला मंत्री कोणत्या?

महसूल मंत्र्यांच्या बंधूंकडे अडीच किलो सोने

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू, प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत. विखे पाटील यांच्याविरुध्द कुठलाही गुन्हा दाखल नाही. न्यायालयातही खटला प्रलंबित नाही. विखे पाटील दाम्पत्याकडे १२ कोटींची चल संपत्ती आहे. यात २५१२ ग्रॅम अर्थात अडीच किलोहून अधिक सोन्याचे दागिने आहेत. त्याची किंमत दीड कोटीहून अधिक आहे. संबंधितांनी स्वत: खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य २२ कोटी असून वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचे मूल्य अडीच कोटींच्या आसपास आहे.