नाशिक: हजारो भक्त परिवाराचे जोरदार शक्ती प्रदर्शन आणि शिवसेनेचा (शिंदे गट) उल्लेख करीत नाशिक लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करणारे स्वामी शांतिगिरी महाराज हे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. ही जागा कुठल्याही पक्षाला सुटली तरी दावेदारी कायम ठेवण्याचे त्यांचे नियोजन आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भक्त परिवार सक्रिय प्रचारात उतरल्याने नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, जालना, शिर्डी या मतदार संघात महायुतीचे उमेदवार निवडून आले होते. त्याची परतफेड नाशिकच्या जागेवर यावेळी आम्हाला प्राधान्य देऊन करावी, असा युक्तिवाद शांतिगिरी महाराज आणि जय बाबाजी भक्त परिवाराने करुन उमेदवारीसाठी महायुतीवर दबाव आणला आहे.
महायुतीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येण्यास केवळ दोन दिवस बाकी असतानाही सुटलेला नाही. बराच विलंब झाल्यामुळे राष्ट्र्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली. त्यास आठवडा उलटूनही पेच सुटलेला नाही. नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळेल की नाही, याबद्दल काही पदाधिकाऱ्यांना साशंकता आहे. या तिढ्याचा लाभ उठविण्याची तयारी महाराजांनी केली आहे. २००९ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. दीड लाख मते घेऊन ते पराभूत झाले होते. वेरूळला महाराजांचा मठ आहे. तेथील भक्तांपेक्षा नाशिक, नगर आणि जळगाव जिल्ह्यात त्यांचा मोठा परिवार आहे. तसेच भक्तांचे नाशिक लोकसभा क्षेत्रात मोठ्या संख्येने नातेवाईक आहेत. हा विचार करून महाराजांनी नाशिकची निवड केल्याचे स्थानिक भक्त सांगतात. महाराजांचा दुसऱ्यांदा अर्ज भरण्यासाठी पाच ते सहा जिल्ह्यांतून उन्हातान्हात भक्त परिवार लोटला होता. अर्ज दाखल होईपर्यंत त्यांनी मौनव्रत पाळले. मोठी गर्दी जमवून त्यांनी महायुतीला आपली शक्ती दाखवली. महायुतीत जागा कुणाला सुटेल हे निश्चित नसल्याने त्यांनी तीनही पक्षांकडून अर्ज भरण्याची तयारी ठेवली आहे. एका उमेदवाराला एका मतदारसंघात चार अर्ज भरता येतात. यातील एकदा अपक्ष व एकदा शिवसेना असे दोन अर्ज त्यांनी दाखल केले आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) त्यांना एबी अर्ज दिलेला नाही.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या मुस्लिमांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर भाजपातील नेत्याचाच घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?
अर्ज भरण्याच्या मुदतीत उर्वरित दोन अर्ज भरले जातील, असे शांतिगिरी महाराजांनी सांगितले. आपल्या समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. २०१४ पासून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत भक्त परिवार घरची भाकरी बांधून प्रचारात सक्रिय राहिला. नाशिक लोकसभेत एकदा विजयी झालेला उमेदवार पुन्हा निवडून येत नसल्याचा इतिहास असताना भक्तांच्या योगदानामुळे दुसऱ्यांदा उमेदवार निवडून आला. इतकेच नव्हे तर, दिंडोरी, धुळे, जळगाव, शिर्डी आणि जालना मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे यावेळी महायुतीने आम्हाला उमेदवारी द्यावी, ही अपेक्षा असल्याचे महाराज सांगतात. महायुतीतील घोळामुळे ज्याला उमेदवारी मिळेल, त्याच्याकडे प्रचारासाठी केवळ १५ ते १६ दिवसांचा अवधी राहणार आहे. आकारमानाने मोठ्या असणाऱ्या मतदारसंघात भक्त परिवाराच्या बळावर महाराज महायुतीवर दबाव टाकत असल्याचे चित्र आहे.