नवी मुंबई : भाजपशी बंडखोरी करत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेणारे संदीप नाईक यांच्या नव्या राजकीय भूमीकेमुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून मंदा म्हात्रे यांच्या समर्थनासाठी नव्याने एकजूट सुरु झाली आहे. विजय नहाटा यांना रिंगणात उतरवून बेलापूरमध्ये म्हात्रे आणि नाईक अशा दोघांविरोधात नवी आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात असलेले शिवसेनेचे (शिंदे) नेते संदीप यांच्या नव्या खेळीमुळे सतर्क झाले असून शिंदे सेनेची संपूर्ण ताकद मंदा म्हात्रे यांच्यामागे उभी करण्याच्या हालचाली पक्षात सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हात्रे यांच्या विजयासाठी बेलापूरात संपूर्ण ताकद उभी करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्याचे वृत्त असून त्यानुसार महायुती एकवटू लागली आहे.
ठाणे जिल्ह्यातील राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून बेलापूर विधानसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करताच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बंडाचे निशाण फडकाविले. समर्थकांच्या बैठका, मेळावे घेत संदीप यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक भाजपमधून तर बेलापूरमधून संदीप महाविकास आघाडीतून निवडणूक रिंगणात आहेत. नाईकांच्या या खेळीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील स्थानिक नेते सावध झाले असून म्हात्रे यांच्या मागे ताकदीने उभे रहाण्याचा निर्णय पक्षाच्या अंतर्गत बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा : घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष
तिरक्या चालींना पुर्णविराम ?
बेलापूर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट होताच शिंदेसेनेचे उपनेते विजय नहाटा यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क सुरु केला होता. ‘ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी एकाच घरात दिली जाणार असेल तर आपण पवारांसोबत जाऊ’ अशी जाहीर भूमीका नहाटा यांनी यापुर्वीच मांडली होती. ‘मी स्वत: बारामतीचा आहे, त्यामुळे पवारांशी संपर्क साधला’ असे जाहीर वक्तव्यही नहाटा यांनी केले होते. नहाटा यांनी ही भूमीका घेताना शिंदेसेनेतील एका मोठा गट त्यांच्यासोबत असल्याची चर्चा होती. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील माजी नगरसेवकांना बोलावून घेत त्यांना तंबीही दिली होती. मंदा म्हात्रे यांना जाहीर झालेली उमेदवारी आणि त्यानंतर संदीप यांनी हाती घेतलेली ‘तुतारी’ यामुळे शहरातील सगळे राजकीय संदर्भ बदलले असून तिरकी चाल खेळत म्हात्रे आणि नाईकांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न करणारे शिंदेसेनेचे नेते महायुती म्हणून पुन्हा एकवटू लागले आहेत.
हेही वाचा : अजित पवारांच्या खेळीमुळे आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटलांसमोर तगडे आव्हान
संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच विजय नहाटा यांची भेट घेऊन पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संदीप नाईक हे बेलापूर विधानसभेतून निवडून आल्यास आपल्याला राजकारण करणे जड जाऊ शकते. त्यापेक्षा मंदा म्हात्रे या निरुपद्रवी आहेत. त्यामुळे निवडणूक लढण्याचा सोस सोडा आणि म्हात्रे यांना एकदिलाने मदत करु अशी भूमीका या पदाधिकाऱ्यांनी नहाटा यांच्यापुढे मांडल्याचे समजते. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बुधवारी आयोजित करण्यात आलेला शिंदेसेनेचा मेळावा हा याच रणनितीचा भाग असल्याचे बोलले जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व नेते एकदिलाने काम करतील हे स्पष्टच आहे. कोणत्याही परिस्थितीत मंदा म्हात्रे निवडून आल्या पाहीजेत आणि शहरातील दलबदलू नेत्यांना चपराक बसायला हवी ही आमची भूमीका आहे. एकीकडे शहराच्या विकासाच्या गप्पा मारायच्या आणि मी, माझे आणि माझ्यापुरते इतकेच पहायचे अशा वृत्तीना आमचा विरोध आहे.
किशोर पाटकर, संपर्क प्रमुख शिवसेना ( शिंदे गट)