नवी मुंबई : भाजपच्या ‘एक कुटुंब-एक तिकीट’ या नव्या राजकीय सुत्रामुळे नवी मुंबईतील राजकारणावर एकहाती पकड राखणारे माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांचे राजकीय आराखडे पुन्हा एकदा चुकतील का याविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नव्या राजकीय समिकरणात ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपच्या पदरात पडेल आणि तेथून आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर गेल्या काही महिन्यांपासून नाईक यांचे थोरले पुत्र संजीव संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. ऐरोली विधानसभेचे आमदार असलेले मोठया नाईकांचा शहरातील बेलापूर विधानसभा मतदारसंघावरही प्रभाव आहे. त्यामुळे ऐरोलीप्रमाणे बेलापूर मतदारसंघावरही नाईकांचे बारीक लक्ष आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या नव्या सुत्रामुळे नाईक कुटुंबियांना नवी मुंबईवरील एकहाती अंमल भविष्यात राखणे शक्य होईल का याविषयी येथील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत.
शिवसेनेत असल्यापासून गणेश नाईक यांचा नवी मुंबईवर नेहमीच एकहाती प्रभाव राहील्याचे दिसून येते. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना तर नाईकांचा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रभाव होता. पक्षाध्यक्ष शरद पवारांनी नवी मुंबईची सगळी सुत्र एकट्या नाईकांच्या हाती सोपवली होती. त्यामुळे शहरातील बेलापूर, ऐरोली या दोन विधानसभा मतदारसंघासह ठाणे लोकसभा मतदारसंघातून नाईक कुटुंबियांनाच उमेदवारी देण्यात आली. मोठा मुलगा संजीव ठाण्याचे खासदार, लहान मुलगा संदीप ऐरोलीतून आमदार तर बेलापूर विधानसभेतून निवडून गेलेले थोरले नाईक स्वत: आमदार, मंत्री आणि पालकमंत्री अशी संपूर्ण जिल्ह्याची सत्ता नाईकांच्या घरातच एकवटली होती. २००४ ते २०१५ या दहा-अकरा वर्षांच्या कालावधीत नाईक म्हणतील ती पुर्वदिशा असा कारभार नवी मुंबईच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात होता. देशात नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भाजपची सत्ता येताच हे समिकरण पुर्णपणे बदलले. मोदी लाटेत संजीव नाईक यांचा लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईकांना निसटत्या मतांनी पराभवाचे तोंड पहावे लागले. ऐरोलीत मात्र संदीप नाईक विजयी झाले. पराभवाच्या दोन धक्क्यानंतरही नाईकांनी वर्षभराने झालेल्या महापालिका निवडणुकीत मात्र सत्ता राखली खरी मात्र शहरातील राजकारणावरील त्यांची पकड ढीली झाल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा : काँग्रेसकडून महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित
एकहाती सत्तेसाठी नाईकांची झुंज
देशाचे आणि राज्यातील बदलती राजकीय समिकरण पाहून नाईक कुटुंबियांनी पुढे भाजपची वाट धरली. गणेश नाईक तसे शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून आनंद परांजपे यांना चार लाखांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला तसा थोरल्या नाईकांवर भाजप प्रवेशासाठी कुटुंबातूनच दबाव वाढू लागला. या दबावापुढे तेही झुकले आणि विधानसभा निवडणुकांना तीन महिन्यांचा कालवधी शिल्लक असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतरही भाजपने बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी दिली आणि थोरल्या नाईकांना ऐरोलीत धाडले. तेव्हाही नाईकांना हा धक्का मानला गेला.
हेही वाचा : कर्नाटक : “येडियुरप्पांच्या सरकारमध्ये ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार”, यत्नल यांच्या आरोपामुळे भाजपा अडचणीत!
भाजपच्या नव्या सुत्रात नाईकांना धक्का ?
राज्यात दोन वर्षांपुर्वी झालेल्या सत्ता बदलानंतर नव्या मंत्री मंडळात गणेश नाईकांना स्थान मिळाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजपने डोंबिवलीच्या रविंद्र चव्हाणांची मंत्री पदासाठी निवड केली. यामुळे नाईक समर्थक नाराज असल्याची चर्चा असताना भाजपने नाईकांचे पुत्र संदीप यांना शहराचे अध्यक्षपद देऊन काही प्रमाणात समतोल राखण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी अजूनही नाईक आणि त्यांचे कुटुंबिय नवी मुंबईतील एकहाती प्रभावासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या काही महिन्यांपासून माजी खासदार संजीव नाईक यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात दौरे सुरु केले आहेत. ठाण्यातील एकही कार्यक्रम ते चुकवित नाहीत. या भागातील पक्षाचे नवे अध्यक्ष संजय वाघुले यांच्याशी त्यांनी उत्तम पद्धतीने जुळवून घेतल्याची चर्चा आहे. ठाणे लोकसभेवर मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा दावा असतानाही संजीव यांची ठाणे भ्रमंती चर्चेचा विषय ठरली आहे. नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे या आमदार असल्या तरी येथून पक्षाने नवा उमेदवार द्यावा असाही एक मतप्रवाह सुरु झाला आहे. नाईक यांचे या मतदारसंघावर आधीपासून लक्ष राहीले आहे. असे असले तरी भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना ‘एक कुटुंब-एक तिकीट’ हे सुत्र राबविण्याचे ठरविले असल्याची चर्चा सध्या आहे. हेच सुत्र पुढेही कायम राहील्यास दोन विधानसभा आणि एक लोकसभा अशा तीन जागांवर प्रभाव राखून ठेवण्याच्या नाईकांच्या मनसुब्यांना मात्र धक्का बसेल अशी भीती त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.