पनवेल : नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आग्रही असलेल्या येथील ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजातील भूमीपुत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील दौऱ्यानंतर चलबिचल वाढल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील विवीध विकास प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी शुक्रवारी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पस्थळी आयोजित करण्यात आलेल्या जंगी सोहळ्यात पंतप्रधानांकडून विमानतळाच्या नामकरणाविषयी स्पष्टता मिळेल अशी अपेक्षा येथील भूमीपुत्रांना होती. प्रत्यक्षात पंतप्रधानांकडून दि.बा यांच्या नावाचा साधा उल्लेखही झाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांनी दि.बा.पाटील नामकरण संघर्ष समितीच्या नेत्यांसह नवी मुंबईच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयीचे गाऱ्हाणे मांडले. विमानतळ नामकरण संघर्ष समितीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या आघाडीवर वेगाने निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिंदे यांनी दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी यासंबंधी योग्य तो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच घेतला जाईल अशी स्पष्ट भूमीका मांडल्याने सलग दुसऱ्या दिवशी प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशा पडल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी ?

भाजपमध्येही अस्वस्थता ?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुढे आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या मुद्दयावरुन भाजपने रान पेटविले होते. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आगरी, कोळी समाजाची संख्या लक्षणीय आहे. या समाजाच्या न्याय हक्कासाठी दि.बा.पाटील यांनी ऐतिहासीक असे आंदोलन केले होते. सिडको प्रकल्पग्रस्तांना मिळालेला साडेबारा टक्के भूखंडाचा परतावा हा दि.बांनी केलेल्या या आंदोलनाचे फलीत मानले जाते. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दि.बांचे नाव मिळावे यासाठी नवी मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यातील भूमीपुत्र कमालीचे आग्रही आहेत. यासंबंधी नेमण्यात आलेल्या नामकरण संघर्ष समितीत ठाणे, रायगडमधील भाजप नेत्यांना मोठा भरणा आहे. या आंदोलनाचे फलीत म्हणून आगरी समाजातील कपील पाटील यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाची लाॅटरी लागल्याची तेव्हा चर्चा होती. दि.बांच्या नामकरणासाठी तेव्हापासून स्वत: पाटील कमालिचे सक्रिय आहेत.

हेही वाचा : आघाडीचे समन्वयक होण्यास नितीश कुमारांचा नकार; जेडीयूची आगामी रणनीती काय?

पंतप्रधानांकडून निराशा

महानगर पट्टयातील वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या लोकार्पणानिमीत्ता विमानतळ प्रकल्पस्थळी आलेल्या पंतप्रधानांकडून नामकरणासंबंधी एखादी घोषणा केली जाईल अशी आशा या भागातील भूमीपुत्रांना होती. दि.बा यांचे सुपूत्र अतुल पाटील यांनीही शुक्रवारी सकाळी यासंबंधी पत्रकारांशी बोलताना आशा व्यक्त केली होती. याशिवाय केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या पाठपुराव्याचे कौतुकही केले होते. आगरी, कोळी समाजातील पारंपारिक पद्धतीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान प्रत्यक्ष कार्यक्रमात पंतप्रधानांनी नामकरण दूर दि.बा यांच्या योगदानाचाही उल्लेख केला नसल्याने या भागातील प्रकल्पग्रस्तांचे नेते आवाक झाले आहेत. समाजात यासंबंधी असलेली चलबिचल लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांनी शनिवारी विमानतळाच्या कामाच्या पहाणीसाठी आलेले हवाई वाहतूक मंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी हे नेते उपस्थित होते. या नेत्यांनी नामकरणासंबंधी काही मिनीटे शिंदे यांच्यासोबत बंद दरवाज्याआड चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी हा निर्णय पंतप्रधानच घेतील असे सांगितल्याने उपस्थित नेतेमंडळी बुचकळ्यात पडल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा : कोकणात भाजपाची ‘मित्रां’वर दबाव तंत्राची खेळी

“विमानतळ प्रकल्पाचे काम अजूनही पुर्ण झालेले नाही. जोपर्यंत विमानतळ प्रकल्पाचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत विमानतळाला नामकरण होऊ शकत नाही. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करणे हे मला तरी अपेक्षित नव्हते. राज्य सरकारने दि. बा. पाटील यांच्या नावाविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रीयेवर अंतिम मत बनले आहे. त्यामुळे विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळेल याविषयी आमच्या मनात शंका नाही.” – प्रशांत ठाकूर, आमदार भाजप

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai visit pm narendra modi did not mentioned the name of db patil print politics news css
Show comments