मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी परस्परांविरोधात लढले होते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांत विधानसभेच्या एकूण ३५ जागा आहेत. युतीत १८ जागा भाजपने लढविल्या होत्या. त्यातील १३ जागांवर ते विजयी झाले. आगामी निवडणुकीत भाजपच्या वाट्याला १४ जागा आल्या आहेत. एकसंघ शिवसेनेने गतवेळी उत्तर महाराष्ट्रात १४ जागा लढविल्या होत्या. सात मतदारसंघात त्यांचे उमेदवार निवडून आले होते. बदललेल्या समीकरणांमुळे शिंदे गटाला तितक्या जागा लढविता आल्या नाहीत. जागा वाटपात त्यांच्या वाट्याला केवळ आठच जागा आल्या. सहा जागांची वजाबाकी झाल्यामुळे अखेरच्या क्षणी शिंदे गटाने दिंडोरी आणि देवळाली या मतदारसंघात अजित पवार गटाविरोधात अधिकृत उमेदवार देत लढणाऱ्या जागांचे संख्याबळ दोन आकडी करण्याची धडपड चालवली आहे. अर्थात माघारीनंतरच ते १० जागा लढवू शकतील की आठवर समाधान मानावे लागेल हे स्पष्ट होईल.
हेही वाचा – दिवाळी पहाटला राजकीय प्रचाराचे ‘फटाके’
u
महाविकास आघाडीत यापेक्षा वेगळी स्थिती नाही. एकसंघ शिवसेनेने मागील निवडणुकीत लढविलेल्या दोन जागांमध्ये यंदा ठाकरे गटाला वजाबाकी करावी लागली. त्यांच्यामार्फत १२ जागा लढविण्यात येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हक्काच्या दोन जागा सोडाव्या लागल्या असून त्यांचे उत्तर महाराष्ट्रात नऊ मतदारसंघात उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी आपली कळवण-सुरगाण्याची जागा माकपला दिली आहे.
हेही वाचा – बंडोबांच्या शांतीसाठी भाजप नेत्यांवर जबाबदारी
काँग्रेसच्या जागा कायम
महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला जागा वाटपात तडजोड करावी लागली असली तरी काँग्रेस त्यास अपवाद ठरली. मागील निवडणुकीत काँग्रेसने नाशिक जिल्ह्यात चार, धुळ्यात तीन, जळगावमध्ये एक आणि नंदुरबारमध्ये चार अशा एकूण १२ जागा लढविल्या होत्या. यातील पाच जागांवर त्यांना विजय मिळाला. यावेळी मित्रपक्षांच्या जागेत कपात झाली असली तरी काँग्रेस गतवेळप्रमाणे १२ जागा लढवित आहे.