नाशिक : उमेदवारीच्या स्पर्धेतून स्वपक्षाने डावलल्याने नाराज असणाऱ्यांना उत्तर महाराष्ट्रातील १५ जागांवर ऐनवेळी थेट प्रतिस्पर्धी वा मित्रपक्षात दाखल झाल्याने उमेदवारी मिळाली आहे. काहींनी अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. अशा नाराजांची सर्वाधिक संख्या भाजपमध्ये असून आयारामांना संधी देण्यात राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेससह अन्य पक्षांनीही हात आखडता घेतलेला नाही.
उत्तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या ३५ मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीने जवळपास सर्व उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मविआ आणि महायुतीत तीन पक्ष एकत्र असल्याने इच्छुकांची अस्वस्थता वाढली. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा, गतवेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला पक्ष, निवडून येण्याची क्षमता आदी निकषांवर जागा वाटप झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. यातील काहींनी अखेरच्या क्षणी मूळ पक्षाला रामराम ठोकत प्रतिस्पर्धी वा मित्रपक्षाशी तडजोड करुन उमेदवारी मिळवली. नाशिक जिल्ह्यात असे सात, जळगाव आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी तीन आणि धुळे जिल्ह्यात दोन मतदारसंघ आहेत.
हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आग्रही! धनुष्य की घड्याळ? सिंदखेड राजात युतीचा मजेदार तिढा कायम!
नाशिक पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (शरद पवार) उमेदवारी मिळविणारे गणेश गिते हे त्यापैकीच एक. भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाजपने त्यांना महानगरपालिकेच्या स्थायी सभापतीपदावर संधी दिली होती.
प्रवेश न करताच उमेदवार
नंदुरबारमध्ये काँग्रेसने नवीन विक्रम रचला. पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच शहादा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र गावित यांना तर, नंदुरबारमधून शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) किरण तडवी यांना उमेदवारी जाहीर केली. संबंधितांचा पक्षात प्रवेश कधी झाला, असा प्रश्न स्थानिक पदाधिकारी करतात. नवापूर मतदारसंघात राष्ट्रवादीने (अजित पवार) भाजपच्या भरत गावित यांना तिकीट दिले आहे.