लोकसभा निवडणुकीपूर्वी ओडिशामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच २५ वर्षांपूर्वी बीजेडीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या बिजॉय महापात्रा यांचे पुत्र अरबिंदा महापात्रा यांनी गुरुवारी (७ फेब्रुवारी) पुन्हा बीजेडीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे २५ वर्षांनंतर होत असलेल्या या मनोमिलनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरबिंदा महापात्रा अलीकडेच विदेशातील नोकरी सोडून, भारतात स्थायिक झाले. काही दिवसांपासून ते केंद्रपाडा जिल्ह्यातील पाटकुरा मतदारसंघात सक्रिय आहेत. ते विविध सभा आणि सार्वजनिक बैठकांना उपस्थित राहत आहेत. तसेच कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ते बीजेडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा – इंडिया आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटेना; आसाममध्ये तृणमूलचे स्वतंत्र उमेदवार

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अरबिंदा महापात्रांचा पक्षप्रवेश :

गुरुवारी अरबिंदा महापात्रा यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री तथा बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्या उपस्थितीत बीजेडीमध्ये प्रवेश केला. यावेळी अरबिंदा महापात्रा यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री पटनायक म्हणाले, “आज अरबिंदा महापात्रा यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आता केंद्रपाडा जिल्ह्यातील जनेतसाठी झपाट्यानं काम करावं. माझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. तसेच त्यांनी त्यांचे वडील बिजॉय महापात्रा यांचेदेखील आभार मानायला हवेत.”

खरे तर काही दिवसांपासून ओडिशातील विविध पक्षीय नेत्यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला आहे. हे सर्व पक्षप्रवेश भुवनेश्वर येथील पक्षाच्या मुख्यालयात पार पडले. मात्र, अरबिंदा महापात्रा यांचा पक्षप्रवेश नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी पार पडला. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला अनेक अर्थांनी राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – ‘राहुल यात्रा’ आज गुजरातमध्ये दाखल; मरणासन्न काँग्रेसला संजीवनी मिळणार का?

कोण आहेत बिजॉय महापात्रा?

दरम्यान, अरबिंदा महापात्रा यांचे वडील बिजॉय महापात्रा हे बीजेडीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. मात्र, २४ वर्षांपूर्वी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. १९८० ते २००० दरम्यान चार वेळा आमदार पाहिलेले बिजॉय महापात्रा हे एकेकाळी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे वडील माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांचे विश्वासू मानले जायचे. १९९० ते १९९५ दरम्यान बिजू पटनायक यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते.

पुढे १७ एप्रिल १९९७ रोजी बिजू पटनायक यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र नवीन पटनायक हे पक्षाचे अध्यक्ष बनले. मात्र, काही दिवसांत नवीन पटनायक आणि बिजॉय महापात्रा यांच्यात मतभेद होण्यास सुरुवात झाली. यादरम्यान बिजॉय महापात्रा यांनी संघटन पातळीवर नवीन पटनायक यांच्या अनेक निर्णयांना विरोध केला. त्यामुळेच त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला, असे मानले जाते.

वर्ष २००० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीने पहिल्यांदा भाजपाबरोबर युती केली होती. मात्र, ही निवडणूक लढविण्यास बिजॉय महापात्रा यांना रोखण्यात आले. त्यांना पाटकुरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली; मात्र काही दिवसांतच त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले. तसेच त्यांच्याऐवजी पत्रकार अतनु सब्यसाची यांना उमेदवारी देण्यात आली. या सर्व घडामोडी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडल्या. त्यामुळे बिजॉय महापात्रा यांना अपक्ष उमेदवारीही दाखल करता आली नाही. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.