वसई: गेल्या काही दिवसांपासून पालघर लोकसभा मतदारसंघात भाजप हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा अखेर अफवाच ठरली आहे. पहिल्याच दिवशी अर्ज भरून बहुजन विकास आघाडीने भाजप आणि महाविकास आघाडीपुढे तगडे आव्हान निर्माण केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. एकूण २१ लाख मतदारांच्या संख्येपैकी निम्मे मतदार हे बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या वसई विरार मध्ये आहेत. त्यामुळे बविआची भूमिका नेहमीच निर्णायक ठरत असते. शिंदे गटात असलेले विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्याबरोबरच भाजपाचा या मतदारसंघावर दावा होता. त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. अशावेळी भाजपाने बविआला जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. बविआला पाठिंबा द्यायचा आणि एक हक्काचा मतदारसंघा मिळवायचा असा भाजपाचा प्रयत्न होता. भाजपाच्या या खेळीमुळे स्थानिक भाजपात अस्वस्थता पसरली होती. भाजप बविआ एकत्र आली तर पुढे कसा होणार? याची चिंता स्थानिकांना होती. संपूर्ण देशात भाजपाची घोडदौड सुरू असताना फक्त बविआने भाजपाचा रथ अडवला होता. त्यामुळे भाजप जाणूनबुजून अशा अफवा पसरवत असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला होता. हा हेतुपरस्सर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होता, असे पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले. परंतु बविआला भाजपाचा पाठिंबा मिळतोय का किंवा महायुती नेमकं कुणाला तिकिट देतंय यावर अनेक दिवस खलबतं सुरू होती. त्यामुळे अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत बविआ आणि महायुतीपैकी कुणीही उमेदवार जाहीर केला नव्हता.

हेही वाचा : भाजपाला गुजरातमधली लढाई का झाली अवघड?

अखेर अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांचा औपचारिक अर्ज दाखल करून स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले. ठाणे, कल्याण शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने पालघरची जागा भाजपाला मिळाली आणि विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कापण्यात आला. भाजपाने दिवंगत माजी आमदार विष्णू सावरा यांच्या मुलाला तिकिट दिले. त्यामुळे या मतदारसंघाची अनिश्चितता संपली आणि तिहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही आजवर भाजपाशी कधी युती केली नव्हती. तसे आम्ही कधी जाहीर केले नव्हते. त्यामुळेच अशा अफवा बिनबुडाच्या असून आम्ही पहिल्या दिवशीच अर्ज सादर केला असे बविआने सांगितले.

हेही वाचा : “तुम्हाला जामीन मिळाला तर तुम्ही फाइल्सवर सही…”; केजरीवालांच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

आता बविआ ताकदीने प्रचारात उतरली असून त्यांनी भाजपासमोर आता मोठे आव्हान उभे केले आहे. वसई विरारसह बविआने जिल्ह्यात वाढवलेल्या आपल्या ताकदीच्या जोरावर भाजप आणि महाविकास आघाडीला नमविण्याचा निर्धार केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत बविआलाला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची साथ होती. त्यामुळे बविआला ४ लाख ९१ हजार मते मिळाली होती. यंदा हे तिन्ही घटक पक्ष नसल्याने पक्षाला मते वाढविण्याचे आव्हान असणार आहे.

मागील ५ वर्षात बहुजन विकास आघाडीने संपूर्ण जिल्ह्यात आपली ताकद निर्माण केली आहे. बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या कामाने पक्षाला ग्रामीण भागात बळकटी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस, डावे पक्ष यंदा बरोबर नसले तरी आमच्या मतांध्ये वाढ होणार आहे आणि पालघरची जागा आम्ही जिंकू.

अजीव पाटील (बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव)
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar lok sabha bjp have only challenge of hitendra thakur s bahujan vikas aghadi print politics news css
Show comments