शिवसेना शिंदे पक्षाच्या ४५ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना बंडामध्ये साथ दिलेल्या बहुतांश आमदारांना अथवा त्यांच्या निकटवर्ती यांना संधी देण्यात आली आहे. मात्र बंडाच्या पहिल्या सत्रापासून सहभागी झालेले पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी जाहीर न झाल्याने उमेदवार बदल अथवा मतदारसंघ बदलाबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

शिंदे यांनी बंड करून सुरत गाठताना सहकारी आमदार यांना प्रथम आमदार श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण सांगून मुंबई सोडली होती. मात्र नंतर रात्रीच्या अंधारात तलासरी चेक पोस्ट ओलांडून बंड करणाऱ्या आमदारांनी सुरत येथे वास्तव्य केले होते. या बंड प्रकरणातील पहिल्या सत्रांपासून श्रीनिवास वनगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले होते.

हेही वाचा – पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या पदरी निराशाच !

विशेष म्हणजे खासदार कै. चिंतामण वनगा यांच्या जानेवारी २०१८ मध्ये अकस्मात निधन झाल्यानंतर भाजपातर्फे वनगा कुटुंबीयऐवजी पर्यायी उमेदवार देण्याच्या हालचालीला वेग आला होता. यावेळी शिवसेनेत मंत्रीपदी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास यांना भाजपामधून शिवसेनेत प्रवेश देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र श्रीनिवास वनगा यांचा लोकसभेच्या पोटनवडणुकीत पराभव झाला होता.

शिवसेनेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांचे पुनर्वसन करण्यासाठी विद्यमान आमदार अमित घोडा यांच्याऐवजी पालघर विधानसभेची उमेदवारी दिली होती. २०१९ च्या निवडणुकीत श्रीनिवास वनगा ६० हजारपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. मात्र नंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांचा लोकसंपर्क मर्यादित राहिल्याचे दिसून आले. शिवसेना (शिंदे) पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बदलानंतर आमदार श्रीनिवास वनगा यांनी नव्याने नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांशी जुळवन घेण्यास स्वारस्य दाखवले नाही. तर पक्ष वाढीसाठी त्यांचे विशेष योगदान झाले नाही असे विद्यमान शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर व्यासपीठावर मत व्यक्त केले आहे. आमदार वनगा यांच्या पक्षांच्या कार्यक्रमात उपस्थितीबाबत देखील पक्षीय कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये त्यांचा सहभाग मर्यादित राहिल्याचे आरोप होत आहेत.

लोकसभा उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करणारे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी पालघरची जागा आपल्याला मिळावी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पालघरची जागा भाजपाकडे राहणार नाही हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा सपाटा लावला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच वरिष्ठ पदाधिकारी तसेच पालघर ग्रामीणचे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री व शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांची या आठवड्यात किमान दोन- तीन वेळा भेट घेतल्याचे सांगण्यात येते. तर पालघर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण यांच्या नावासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. बहुदा या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत पालघर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारच्या नावाची घोषणा झाली नाही अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनिवास वनगा यांचा व त्यांच्या समर्थकांचा जीव टांगणीवर पडला आहे.

हेही वाचा – कल्याण पट्ट्यात मनसे-भाजपची हातमिळवणी ?

याविषयी आमदार श्रीनिवास वनगा यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या पाच वर्षांत मी अनेक योजनांवर काम करून पालघर मतदारसंघात १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधींची विकास कामे आणली आहेत. माझ्या कामावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाधानी असून त्यांना योग्य वाटल्यास ते मला पुन्हा उमेदवारी देतील असा विश्वास श्रीनिवास वनगा यांनी लोकसत्ताकडे व्यक्त केला.

अदलाबदलीचा प्रस्ताव

महायुतीच्या जागावाटप सूत्रामध्ये पालघर व बोईसर विधानसभा या दोन जागा शिवसेनेकडे तर डहाणू व विक्रमगड या दोन जागा भाजपाकडे सुटल्याची जवळपास निश्चित झाले आहे. मात्र स्थानीय परिस्थिती व इच्छुक उमेदवारांची नावं पाहता पालघरसाठी राजेंद्र गावित (भाजपा), डहाणूसाठी श्रीनिवास वनगा (शिवसेना-शिंदे) विक्रमगडसाठी प्रकाश निकम (शिवसेना-शिंदे) तर बोईसरसाठी विलास तरे (भाजपा) यांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडे ठेवून त्यासाठी पक्षीय पदाधिकारी पाठपुरावा करीत असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.