परभणी : ‘धनुष्यबाण’ आणि शिवसेनेचे अतूट नाते ही परभणी लोकसभा मतदारसंघाची ओळख… गेल्या ३५ वर्षांत शिवसेनेच्या याच चिन्हापुढे अनेक प्रस्थापित विरोधकांची शिकार झाली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हे चिन्ह गमावल्याने आता शिवसैनिकांना ‘मशाल’ हाती घ्यावी लागली. धनुष्यबाणाशिवायची शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. हा चिन्ह बदल शिवसेनेला राजकीयदृष्ट्या कितपत मानवतो याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
नव्वदच्या दशकात मराठवाडय़ात ग्रामीण भागात शिवसेनेचा झंझावात आला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाची चौकट त्याने खिळखिळी केली. या तडाख्यात अनेक प्रस्थापितांचे राजकारण संपले. ज्या भागात शिवसेनेने काँग्रेसच्या परंपरागत सत्तास्थानांना हादरे दिले त्यात परभणीचाही समावेश होतो. तरुणाईच्या बळावर शिवसेनेने राजकारणातली ही उलथापालथ केली. १९८९ च्या निवडणुकीत अशोक देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. राजकीय पक्ष म्हणून या पक्षाला तोवर मान्यता नव्हती. त्यामुळे देशमुख यांची त्यावेळची उमेदवारी ही अपक्षच होती. काँग्रेसच्या रामराव लोणीकर यांचा पराभव करून ते ६५ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. अशोक देशमुख आणि विलास गुंडेवार (हिंगोली) यांच्या विजयानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. शिवसेनेची निवडणूक निशाणी असलेला ‘धनुष्यबाण’ हाच पुढे या पक्षाला राज्याच्या सत्तेत वाटेकरी मिळवून देणारा ठरला. त्या विजयाची नांदी परभणीने घातली आहे. पुढे १९९१ च्या निवडणुकीत अशोक देशमुख हे शिवसेनेच्याच धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर निवडून आले.
हेही वाचा : ईडी, सीबीआय अन् प्राप्तिकर विभागाची कारवाई निवडणुकीचा खेळ बिघडवणार? माजी निवडणूक आयुक्त म्हणाले…
या मतदारसंघात ग्रामीण भागात आणि वाडी वस्ती तांड्यावर धनुष्यबाण हे चिन्ह पोहोचले. धनुष्यबाणाच्या या चिन्हावर सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर, संजय जाधव आदींना खासदारकीची संधी मिळाली. निवडून आलेला खासदार पक्ष सोडून जातो हा अनुभव शिवसेनेने बहुतांश खासदारांच्या बाबतीत घेतला होता. जेव्हा तत्कालीन खासदार तुकाराम रेंगे यांनी शिवसेना सोडली तेव्हा या पक्षाने नवाच प्रयोग केला. शिवसेनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या आणि काँग्रेसच्या जुन्या नेत्यांपैकी असलेल्या गणेश दुधगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. धनुष्यबाणाच्या चिन्हावर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दुधगावकर निवडून आले. त्यांनी सुरेश वरपूडकर यांचा पराभव केला होता. परभणी मतदार संघात धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिवसेनेने १९८९ ते २०१९ अपवाद फक्त १९९८चा निवडणुका जिंकल्या. १९९८ च्या निवडणुकीत सुरेश वरपुडकर विजयी झाले होते.
खान की बाण ?
शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत धनुष्यबाणाचा महत्त्वाचा वाटा आहे. विधानसभेला तर अनेक वेळा ‘खान हवा की बाण’ असा प्रचार झालेला होता. या प्रचाराद्वारे धार्मिक ध्रुवीकरण करून शिवसेनेने विधानसभेला बाजी मारली आहे. मात्र गेल्या साडेतीन दशकाहून अधिक काळ सर्वदूर रुजलेल्या या चिन्हाशिवाय आता शिवसेनेला पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाचे परभणीत जोरदार पडसाद उमटले होते. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आक्रमक होत आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ‘बोंबमारो आंदोलन’ केले होते. जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी त्यावेळी निवडणूक आयोगाच्या निकालाचा जाहीर निषेध नोंदवला होता. धनुष्यबाणाच्या चिन्हावर दोन वेळा खासदारकी जिंकलेले संजय जाधव आता तिसऱ्यांदा मात्र या चिन्हाशिवाय लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
हेही वाचा : दिल्लीत सुरात सूर, राज्यांत ‘इंडिया’ बेसूर
चिन्ह मिळवाल पण जनाधार कुठून आणणार ?
एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपच्या कृपेने पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले तरी जनाधार त्यांच्यासोबत नाही. कपट,कारस्थान करून तुम्ही चिन्ह मिळवाल पण जनाधार कुठून आणणार ? शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न मधल्या काळात गद्दारांनी केला. त्यांच्यामुळेच धनुष्यबाणाऐवजी मशालीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी लागत आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांचा उन्माद मशालीच्या आगीत जळून खाक होईल.
-खासदार संजय जाधव, परभणी