परभणी: लोकसभेची सर्व तयारी करूनही ऐनवेळी राष्ट्रीय समाज पक्षासाठी दोन पावले मागे आलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जिल्ह्यात राजेश विटेकर यांच्या रूपाने राजकीय गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या विटेकरांना महादेव जानकर यांच्यासाठी माघार घ्यावी लागली होती. त्याचवेळी विटेकर यांच्या या त्यागाची पक्ष यथोचित नोंद घेईल, असे आश्वासन अजित पवारांनी दिले होते.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून खासदार संजय जाधव यांच्या विरोधात राजेश विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे सुरुवातीला निश्चित झाले होते. विटेकर कामालाही लागले होते मात्र ऐनवेळी रासपच्या महादेव जानकर यांची ‘एन्ट्री’ झाली. २०१९ च्या निवडणुकीत विटेकर यांनी खासदार संजय जाधव यांच्याशी चांगली लढत दिली होती त्यावेळी विटेकरांचा स्वकीयांनीच घात केला. लोकसभेला पराभूत झालेल्या विटेकरांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पुन्हा लोकसभा लढवण्याचा त्यांचा मनोदय होता. लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीने परभणीत युवक व विद्यार्थी मेळावे घेऊन कोणत्याही परिस्थितीत परभणीची जागा लढवायची असा चंग बांधला होता. सामाजिक समीकरणांचा विचार करून वाटाघाटीत परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला गेल्यानंतर राष्ट्रवादीला दोन पाऊल मागे यावे लागले. लोकसभा डोळ्यासमोर ठेवून पक्षाने सर्व हालचाली चालवल्या होत्या. परभणीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्याकडे होते. जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर सावंत यांच्याकडील पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांच्याकडे आले. बनसोडे यांना पालकमंत्रीपद देऊन जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी वाटपात आपल्या पक्षाला झुकते माप द्यायचे आणि लोकसभेची बांधणी करायची, असा राष्ट्रवादीचा इरादा होता. जानकरांच्या ऐनवेळी घोषित झालेल्या उमेदवारीने राष्ट्रवादीला काहीकाळ थबकावे लागले.आता पुन्हा विटेकरांच्या रूपाने राष्ट्रवादीने जिल्ह्यात नवी राजकीय गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा : हेमंत सोरेनच पुन्हा होऊ शकतात झारखंडचे मुख्यमंत्री; काय आहे पक्षांतर्गत राजकारण?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या जिल्ह्यात पक्षाची बांधणी करण्याचा प्रयत्न केला असला तरी या पक्षातही मतभेद आहेतच. विटेकर यांच्यासह आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, माजी महापौर प्रताप देशमुख हे या पक्षाचे जिल्ह्यातले प्रमुख स्थानिक नेते आहेत. त्यापैकी बाबाजानी आणि विटेकर यांच्यात सख्य नाही. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार श्रीमती फौजीया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, विजय भांबळे हे शरद पवारांसोबत तर शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, राजेश विटेकर हे तिघे अजित पवारांच्या गोटात दाखल झाले. बाबाजानी बराच काळ पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या गटात होते. खूप उशिराने त्यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश घेतला. या गटात येऊन त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी मिळवले. आपली बांधिलकी कोणत्या गटाशी ठेवायची हा विचार करताना या सर्वच नेत्यांनी पक्षाच्या एकनिष्ठतेपेक्षा स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार केला आहे. विटेकर आणि बाबाजानी एकाच पक्षात असले तरी दोघातला विसंवाद पक्ष नेतृत्वाला माहित आहे. लोकसभा निवडणुकीत मधुसूदन केंद्रे हेही अलिप्तच होते. लोकसभा निवडणुकीत विटेकर यांनी आपले काम मन लावून केले अशी प्रशस्ती जानकर यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे केली. विटेकर यांना पक्षाने आमदारकी देऊ केली असली तरी जिल्ह्यात आपल्या पक्षात गटबाजी राहणार नाही याकडेही पक्षनेतृत्वाला लक्ष द्यावे लागेल. त्याचवेळी जिल्ह्यात यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्रे विटेकर यांच्याकडेच असतील यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.
हेही वाचा : राहुल गांधींच्या भाषणावर मोदी-शाहांसह सत्ताधाऱ्यांनी का नोंदवला आक्षेप?
बाबाजानी – विटेकर यांच्यातील मतभेदाचे कारण
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोट बांधली तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची रणनीती आखली गेली. त्यावेळी बाबाजानी यांनी बोर्डीकर यांच्याशी संधान साधले. राष्ट्रवादीच्या संचालकांनी महाविकास आघाडी सोबत जावे असा पक्षादेश असताना बाबाजानी यांनी या आदेशाला छेद देणारी भूमिका घेतली. संचालक असलेल्या राजेश विटेकर यांनी महाविकास आघाडी सोबत जाणे पसंत केले. ही दोघातल्या मतभेदाची पहिली ठिणगी होय. या घटनेपासून बाबाजानी विरुद्ध विटेकर हा अंतर्गत संघर्ष राष्ट्रवादीत सुरू झाला. तोवर बाबाजानी यांच्या प्रभावाखाली असलेल्या विटेकर यांनी हळूहळू पक्षात आपली स्वतंत्र वाट चोखाळायला प्रारंभ केला. बाबाजानी यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असताना राष्ट्रवादीने विधान परिषदेची उमेदवारी देऊन विटेकर यांना झुकते माप दिले आहे.