परभणी : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघामध्ये २२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली.या प्रक्रियेत परभणी मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सय्यद समी उर्फ माजू लाला यांचा अवैध ठरला आहे. तर जिंतूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच अर्ज वैध ठरले आहेत. आज जरी जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत असली तरी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत यातले किती शिल्लक राहतात याबाबत उत्सुकता आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघात एकूण ५९ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते. एकूण ४६ उमेदवारांचे ४४ नामनिर्देशनपत्र वैध ठरले तर १५ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या ३७ इतकी आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघात एकूण ४१ उमेदवारांचे ५० नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. छाननीमध्ये ४१ उमेदवारांचे ५० नामनिर्देशन पत्र म्हणजे दाखल केलेले सर्वच अर्ज वैध ठरले आहेत.

हेही वाचा : राजकारणातील बड्या चेहऱ्यांची यंदा वंचितकडे पाठ

पाथरी मतदारसंघात बुधवारी छाननीअंती ५३ पैकी ६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता ४७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. तसेच एकूण ७७ अर्जांपैकी ११ उमेदवारांचे १२ अर्ज बाद झाले असल्याने ६५ अर्ज वैध ठरले आहेत. गंगाखेड मतदारसंघात एकूण २९ उमेदवारांचे ३८ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ३३ नामनिर्देशनपत्र वैध तर ५ अर्ज अवैध ठरले आहेत. वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २५ आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली.

हेही वाचा :एमआयएमचे वारिस पठाण भिवंडीतून रिंगणात, मतविभाजनाचा फटका काँग्रेसला ?

समीकरणावर परिणाम

मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ४६ उमेदवारांनी ५९ अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विद्यामान आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना शिंदे गटाचे आनंद भरोसे आणि वंचित बहुजन आघाडीचे सय्यद समी उर्फ माजू लाला यांच्याकडे ठळक उमेदवार म्हणून पाहिले जात होते. माजूलाला यांची उमेदवारी मतदारसंघात निर्णायक ठरेल असे वाटत असतानाच आता त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने थेट निकालाच्या समीकरणावर परिणाम होणार आहे.

छाननीमध्ये माजू लाला यांच्या नामनिर्देशन अर्जातील तांत्रिक चुकीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले.