परभणी : प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ‘खान हवा की बाण’ असे म्हणत धार्मिक ध्रुवीकरण करून विजयाकडे झेपावणाऱ्या शिवसेनेच्या बाबतीत परभणी मतदार संघातले गणित यावेळी बदलले आहे. असा प्रचार करण्याऐवजी मुस्लिम मते आपलीशी करण्याकडे शिवसेना ( ठाकरे) पक्षाचा कल आहे. महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जर परभणीची जागा सुटली तर दोन सेनेतच या मतदारसंघातली लढत पाहायला मिळेल. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या हाती त्यावेळी ‘धनुष्यबाण’ असेल पण मग आधीच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या घोषणेचा वापर शिंदे सेना करणार काय असाही प्रश्न आहे. एकूणच या निवडणुकीत शिवसेनेच्या या जुन्या घोषणेचे संदर्भ मात्र पूर्णपणे बदलून गेले आहेत.

परभणी मतदारसंघात १९९० मध्ये सेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर हनुमंत बोबडे विजयी झाले. काँग्रेसने शमीम अहमद खान यांना उमेदवारी दिली होती, तर जनता दलाकडून विजय गव्हाणे रिंगणात होते. खान व गव्हाणे या दोघांनी राजकीय भाषेत ‘धर्मनिरपेक्ष’ मतांचे विभाजन केले. त्या वेळी बोबडे यांनी खान यांच्याविरुद्ध तब्बल १२ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला. गव्हाणे व खान यांना मिळालेली मते ६५ हजार होती, तर बोबडे यांनी ४९ हजार मते मिळवली. या निवडणुकीपासून सेनेने हा प्रचार सुरू केला असे बोलले जाते.

हेही वाचा : सलग निवडून येणाऱ्या महायुतीतील १५ आमदारांना जनमत रोषाचा फटका ?

१९९० पासून सेनेचा भगवा परभणी मतदारसंघात सातत्याने फडकत आहे. मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाल्यानंतर सेनेला विजय आणखी सोपा जातो. सेनेचे उमेदवारही थेट तसा प्रचार करतात. बोबडेंच्या विजयानंतर परभणी मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निर्माण होणारे भगवे वातावरण, तसेच बाळासाहेब ठाकरे यांची सभा हे समीकरण सेनेला विजयापर्यंत घेऊन जात होते. १९९५ लाही सेनेने येथे विजय मिळवला. त्या वेळी काँग्रेसने खान यांनाच उमेदवारी दिली होती. खान यांनी ३७ हजार, तर सेनेच्या तुकाराम रेंगे यांनी ५७ हजार मते घेतली. रेंगे यांनी २० हजारांचे मताधिक्य घेतले.

हळूहळू सेनेने या मतदारसंघावर आपला प्रभाव कायम ठेवला आणि ‘धनुष्यबाण’ हे सेनेचे चिन्ह हिंदुत्ववादी मतदारांच्या मनावर ठसले. १९९९ मध्ये पुन्हा रेंगे यांना आमदारकीची संधी मिळाली. काँग्रेसने या वेळी लियाकत अली अन्सारी यांना उमेदवारी दिल्याने रेंगे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. प्रत्येक वेळी समीकरणे बदलत गेली, तरी सेनेला राजकीय यश मिळत गेले. २००४ मध्ये सेनेने संजय जाधव यांना उमेदवारी दिली. या वेळी त्यांच्या विरोधात सेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अशोक देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिली. जाधव यांना पुन्हा २००९ च्या निवडणुकीत विजय मिळाला. याचे कारण विखार अहमद खान यांची उमेदवारी. विखार अहमद खान यांची उमेदवारीही सेनेला त्यावेळी नेहमीच्याच प्रचारासाठी फायदेशीर ठरली.

हेही वाचा : बच्‍चू कडूंचा रवी राणांवर ‘प्रहार’, रवी राणांच्‍या विश्‍वासू सहकाऱ्याला घेतले पक्षात

२०१४ च्या डॉ. राहुल पाटील यांच्या विरोधात निवडणुकीत एमआयएमकडून सज्जूलाला तर काँग्रेसकडून इरफानुर रहमान खान रिंगणात होते. पारंपरिक हिंदुत्ववादी मतदाराला ‘कमळ’ हा पर्यायही उपलब्ध होता कारण या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांची युती नव्हती. तरीही या निवडणुकीत शिवसेनेने आपली जुनीच घोषणा कायम ठेवून राहुल पाटील यांच्या रूपाने विजय मिळवला. गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. राहुल पाटील यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ५४ टक्के मते घेऊन त्यांनी सर्वच उमेदवारांची अनामत जप्त केली.

परभणी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे. अशावेळी काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्यानंतर शिवसेनेला प्रचार करणे सहज सोपे जाते. असा आजवरचा अनुभव आहे. ‘खान पाहिजे की बाण पाहिजे’ असा प्रचार आक्रमक पद्धतीने केला जातो. यातून धार्मिक ध्रुवीकरण करायचे आणि राजकीय लाभ मिळवायचा अशी शिवसेनेची योजना असते. त्यात सेना अनेकवार यशस्वी झाली आहे. मात्र, या निवडणुकीत धनुष्यबाणाचे राजकीय संदर्भ पार बदलून गेले आहेत.