परभणी: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या विधानसभा उमेदवारांच्या यादीत पाथरी विधानसभा मतदारसंघातून श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून गेल्या अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा या मतदारसंघात ‘विटेकर विरुद्ध वरपूडकर’ असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. विटेकर या आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री आहेत.
दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश विटेकर यांच्याकडे पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी कोरा ‘एबी फॉर्म’ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे विटेकर यांच्या कुटुंबातीलच सदस्य पाथरी विधानसभेचा या पक्षाचा उमेदवार असेल हे स्पष्ट झाले होते. आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या नावाचा समावेश आहे. श्रीमती विटेकर या परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांच्याशी विटेकर यांची लढत आता होणार असली तरी विटेकर विरुद्ध वरपूडकर असा परंपरागत संघर्ष या मतदारसंघात आधीपासून आहे.
हेही वाचा : घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष
ॉ
राजेश विटेकर यांचे वडील उत्तमराव विटेकर हेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. वरपूडकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात विटेकर यांच्याशी पाथरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवूनच झालेली होती. त्यावेळी सिंगणापूर या नावाने हा मतदारसंघ परिचित होता.१९७७ मध्ये राजेश यांचे वडील उत्तमराव विटेकर हे सिंगणापूर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. शरद पवार यांच्यासोबत ते समाजवादी काँग्रेसमध्ये होते. १९८५ मध्ये त्यांनी एस. काँग्रेस सोडून विधानसभा लढविली. यावेळी त्यांची लढत राजकारणात नवख्या असलेल्या वरपूडकर यांच्याशी झाली. या मतदारसंघात बराच काळ वरपूडकर विरुद्ध विटेकर असा संघर्ष कायम राहिला. राजेश विटेकर यांनी राजकारणात आपला जम बसवल्यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. तथापि त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली. दुसऱ्यांदा लोकसभेची तयारी झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने परभणी मतदार संघ रासपला सोडला त्यानंतर विटेकर यांची नियुक्ती विधान परिषदेवर झाली. अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या विटेकर यांच्याच संमतीने पाथरीचा उमेदवार निवडला जाईल हे अपेक्षित होते.
हेही वाचा : संदीप नाईकांच्या बंडामुळे महायुती एकवटली
निर्मलाताई विटेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पाथरी मतदारसंघातूनच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने तयारी करत असलेल्या सईद खान यांच्यासमोर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी पाथरी विधानसभा मतदारसंघात ‘विटेकर विरुद्ध वरपूडकर’ असा जुनाच संघर्ष नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.