मे आणि जून महिन्यात देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपाला अवघ्या २४० जागा मिळाल्या. देशातलं सरकार एनडीएचं सरकार आहे. दरम्यान नुकतंच संसदेचं हिवाळी अधिवेशन संपलं आहे. आता भाजपात अंतर्गत निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार आहे. नव्या वर्षात म्हणजेच फेब्रुवारी २०२५ च्या शेवटापर्यंत भाजपात हा बदल झालेला पाहण्यास मिळेल.
सध्या भाजपात काय चाललं आहे?
भाजपात सध्या या निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरु आहे. तसंच बूथ पातळीवर, जिल्हा आणि विभाग पातळीवर जे प्रमुख निवडायचे आहेत त्यांचीही निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. लवकरच केंद्रीय नेतृत्वाकडून राज्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष किंवा प्रमुख निवडले जातील. त्यानंतर नव्या अध्यक्षांची निवड भाजपात केली जाईल.
महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीत भाजपाची उत्तम कामगिरी
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने उत्तम कामगिरी केली. लोकसभा निवडणुकीत हात पोळले गेल्यानंतर संघ आपल्याला कशी मदत करु शकतो हे भाजपाला समजलं आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या आधी विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आम्हाला आता संघाशिवाय वाटचाल करायला आम्ही सक्षम आहोत विधान केलं होतं. ज्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. ज्यानंतर शहाणं होत भाजपाने संघाची मदत घेतली. त्यानंतर संघ काय किमया घडवू शकतो हे महाराष्ट्रात दिसलं. भाजपाला १३२ जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. आता नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार आहे. आता नव्या अध्यक्षांच्या निवडीवर नरेंद्र मोदींची छाप असणार आहे यात काही शंका नाही. मोदी आणि अमित शाह यांच्याकडून कुणाची निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशाच व्यक्तीची निवड करतील ज्याला संघाची वैचारिक पार्श्वभूमी असणार आहे.
संघाची पार्श्वभूमी असलेला नेताच होणार अध्यक्ष
महाराष्ट्र आणि हरियाणा या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता भाजपाकडून राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जे. पी. नड्डांना जेव्हा निवडण्यात आलं तेव्हा संघानेही त्यांना पाठिंबा दिला होता. कारण २०१९ मध्ये भाजपाला उत्तम यश मिळालं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी, अमित शाह आणि संघ परिवार यांच्याकडून अशाच माणसाची निवड होईल ज्या व्यक्तीला संघाची योग्य पार्श्वभूमी असणार आहे. त्यामुळे हा चेहरा कुणाचा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसंच त्या व्यक्तीची जात, वय या दोन निकषांचा प्रामुख्याने विचार केला जाईल यातही शंका नाही.
© IE Online Media Services (P) Ltd