पिंपरी : राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपने दावा केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही शहरातील पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची बैठक खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – बेलापूरात शिंदे-फडवणीसांना ‘बहिणी’ची साद; मंदा म्हात्रे ‘लाडक्या’ ठरतील का याचीच चर्चा अधिक

पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे. तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार आहे. त्याव्यतिरिक्त भोसरी आणि चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे चिंचवड आणि भोसरी विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत, असा ठराव शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला. त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी अनुमोदन दिले. या ठरावामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत कलगीतुरा रंगला आहे.

हेही वाचा – मराठवाड्यात भाजपने कंबर कसली, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. तर, भोसरीत भाजपचे महेश लांडगे आणि चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी चिंचवडे या आमदार आहेत. महायुतीत ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा’, असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार असलेल्या पक्षाकडे मतदारसंघ कायम राहतील असे मानले जात होते. मात्र, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरीवर दावा सांगितल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला. भाजपनेही पिंपरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला. शिवसेना आणि भाजपने पिंपरी मतदारसंघावर दावा केल्याने आमदार बनसोडे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते. त्यामुळेच आता राष्ट्रवादीनेही पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड या तीनही मतदारसंघांवर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad all is not well in the mahayuti ncp ajit pawar claims all constituencies print politics news ssb