पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सरसावले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शहरावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घरातच सर्व महत्त्वाची पदे दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. तर, रोहित यांना नैराश्य आल्याचा आरोप करत तथाकथित युवा नेतृत्व म्हणत तटकरे यांनी त्यांची खिल्ली उडविली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या शहरात आरोप-प्रत्यारोप रंगल्याचे दिसले.
बारामती खालोखाल पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानले जाते. शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनेक वर्षे दादागिरी चालली. २०१७ पर्यंत अजित पवार ‘बोले आणि प्रशासन डोले’ अशी परिस्थिती होती. परंतु, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरेंनी अजित पवारांची साथ सोडून कमळ हातात घेतले आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. त्यामुळे राष्ट्रवादीला पाच वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. अजित पवार शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शहरातील पक्षाचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह कार्यकारिणीने अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : शिंदे गटाची १८ जागांची मागणी भाजप मान्य करणार का ?
भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत आलेले आझम पानसरे यांनी शरद पवार यांना साथ देण्याची भूमिका घेतली. त्यांच्याशिवाय कोणताही मोठे पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत राहिला नाही. त्यामुळे शहरात आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे. अजित पवार यांच्यामुळेच शहराचा सर्वांगीण विकास झाल्याचा दावा केला जातो. महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे पवार यांचे स्वप्न आहे. त्याकरिता त्यांनी पुन्हा शहरात लक्ष घातले आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच शहराचा दौरा केला. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनेतील पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच शरद पवार यांच्याकडून शहराची जबाबदारी असलेल्या आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
हेही वाचा : बीडमध्ये पंकजा मुंडे उमेदवार ?
रोहित पवार यांना नैराश्य आले आहे. त्यांच्या युवा यात्रेला राहुल गांधींच्या यात्रेपेक्षा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे (उपहासाने) त्यांचा आत्मविश्वास इतका दुणावला गेला आहे की, आता काहीही बोलण्यासाठी ते प्रसिद्ध झाले आहेत. आम्हाला महायुतीत लोकसभेच्या किती जागा मिळतात. यापेक्षा महाविकास आघाडी किती जागा लढविते, किती उमेदवार निवडून येतात, हे तथाकथित युवा नेतृत्वाने पहावे. त्यानंतर आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करावा, अशी टीका तटकरे यांनी केली. त्याला रोहित यांनीही प्रत्युत्तर दिले. खासदार सुनील तटकरे यांनी घरातच महत्त्वाची पदे दिली. त्यांचे बंधू अनिल तटकरे हे आमच्यासोबत आहेत. अजित पवार गटाला लोकसभेच्या केवळ चारच जागा मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच पिंपरी-चिंचवड शहराचा विकास केवळ शरद पवार यांच्यामुळे झाला. त्यांनी केंद्रातून शहरासाठी मोठा निधी दिला. अजित पवार यांच्या अवतीभवती ठेकेदार, मलिदा गँग होती. आता मलिदा गँग तिकडे गेल्यानंतर प्रामाणिक कार्यकर्ते आमच्याकडे राहिले आहेत, असेही ते म्हणाले. यावरून आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठा कलगीतुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.