पिंपरी : आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या मानसिकतेत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसकडे निवडणुकीसाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गटबाजीची परंपरा आणि पक्षश्रेष्ठींकडून कायम दुर्लक्षित राहिलेल्या शहर काँग्रेसची निवडणुकीची तयारी काय, हे तूर्त गुलदस्त्यात आहे.
एकेकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक ताकदीचा पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जात होते. तथापि, गेल्या काही वर्षात काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. दिवंगत रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर प्रबळ नेतृत्व पक्षाला मिळालेच नाही. २०१७ मध्ये पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. सर्व जागांवर उमेदवार देताही आले नाहीत. आगामी निवडणुकीत चित्र काय राहील, याविषयी पक्षातच साशंकता आहे.
संभाव्य महाविकास आघाडीत न जाता स्वबळावर लढण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. मात्र, सर्व जागा लढण्यासाठी उमेदवार मिळतील का, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या कार्यकर्त्यांना शहरात वैयक्तिक लक्ष घालू, अशी ग्वाही दिली होती. तथापि, प्रत्यक्षात तसे झालेले नाही. पक्षाच्या कार्यक्रमासाठी ते शहरात अजून फिरकलेही नाहीत.
शहर काँग्रेसला गटबाजीची जुनीच परंपरा आहे. टी. ए. तिरूमणी, सुरेश सोनवणे, नानासाहेब शितोळे, हनुमंत गावडे, श्रीरंग बारणे, भाऊसाहेब भोईर, सचिन साठे यांनी आतापर्यंत काँग्रेस शहराध्यक्षपदावर काम केले. प्रत्येकाने आपापल्या काळात गटबाजीचे राजकारण अनुभवले आहे. सध्याचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासमोरही तशीच परिस्थिती आहे. त्यांची नियुक्ती होताच पक्षातील गटबाजीने पुन्हा डोके वर काढले होते. प्रतिकूल परिस्थिती असतानाही गेल्या पाच वर्षात कार्यकर्त्यांनी आंदोलने, विविध उपक्रम राबवत पक्षाचे अस्तित्व जिवंत ठेवले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्या वातावरण निर्मितीचा उपयोग होऊ शकतो. तरीही पिंपरीत स्वतंत्रपणे लढण्यासारखी काँग्रेसची स्थिती नाही. राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा दिसून येत नाही. तसेच स्वबळावर काही नगरसेवक निवडून आणू शकेल, असा नेता काँग्रेसकडे नाही. पक्षश्रेष्ठी शहरात लक्ष घालतील, असेही निदर्शनास येत नाही. शहराध्यक्ष कैलास कदम यांनी संघटनात्मक उपक्रम, इंटक, पक्षाची आंदोलने आदींच्या माध्यमातून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र, अजूनही पक्षश्रेष्ठींनी पिंपरी पालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतलेली दिसत नाही, अशी चर्चा पक्षातच ऐकायला मिळते.