संजय राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात पक्ष बळकटीसाठी शरद पवार गटाची धडपड सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील काही माजी आमदारांशी संपर्क साधून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यासाठी शरद पवार गट कामाला लागला आहे.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी आणि अर्जुनी मोरगाव या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. राजू कारेमोरे आणि मनोहर चंद्रिकापुरे हे या दोन मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या दोन्ही आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही मतदारसंघांवर शरद पवार गटाने लक्ष केंद्रित केले आहे. जयंत पाटील येथील माजी आमदार व २०१९ च्या निवडणुकीत येथे पराभूत झालेल्या उमेदवारांच्या संपर्कात आहेत. गेल्या आठवड्यात शरद पवार गटाचे आमदार, माजी मंत्री अनिल देशमुख आणि माजी आमदार दीनानाथ पडोळे गोंदियात येऊन गेले. त्यांनी मेळाव्याद्वारे अंदाज घेतला. शरद पवार गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे यांनीही संपूर्ण ताकदीनिशी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा… जमली तर पक्षनिष्ठा नाही तर पक्षापासून सुटका !

अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गोंदिया, भंडारा या दोन्ही जिल्ह्यांतील सर्वसाधारण प्रवर्गातील काही माजी आमदारांना शरद पवार गटात आणण्याची जबाबदारी देशमुख, पडोळे, डॉ. खुशाल बोपचे, रविकांत (गुड्डू) बोपचे, सौरभ रोकडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आजी-माजी आमदारांशी चर्चा करून त्याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सुपूर्द केला जाणार आहे.

हेही वाचा… ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ- चंद्रकांत पाटील या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात आपली स्थिती मजबूत करणे शरद पवार गटाला सोपे जाणार नाही. यामुळे शरद पवार गटाकडून सुरू असलेल्या पक्षबळकटीच्या या प्रयत्नांना किती प्रमाणात यश येईल, हे येणारा काळच सांगेल. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून भविष्यात त्यात आणखी बदल होणार, हे निश्चित.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In praful patels stronghold gondia district sharad pawar group struggling to strengthen the party print politics news asj