छत्रपती संभाजीनगर – माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षांपासून नेतृत्त्व करत असलेल्या सोळंके परिवाराविरोधात दंड थोपटून लढण्यासाठी अनेक जण सध्या तयारी करत आहेत. त्यातील अनेक जण तुतारी फुंकण्यासाठी सज्ज असून, यामध्ये काही भाजप नेतेही आहेत. प्रकाश सोळंके हे सध्या अजित पवार गटात आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात त्यांच्या घरावर झालेल्या जाळपोळीनंतर ते चर्चेत होते.
माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वत: निवडणूक लढण्यापेक्षा पुतणे जयसिंह सोळंके यांना पुढे चाल दिली आहे. आपण निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यांच्या निवडणूक न लढण्याच्या निर्णयात सोळंके घराण्याचेच वर्चस्व मतदारसंघावर कायम राहावे, असा डाव असला तरी त्याला हादरे देण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. माजलगाव महायुतीकडे जाईल, अशी दाट शक्यता असली तरी भाजपमधील काही नेतेही येथून चाचपणी करताना दिसत आहेत. महायुती तुटली तर भाजपचा एक नेता लढण्याची तयारी करत असून, महायुती अभेद्य राहिली तरी अन्य पक्षाकडूनही लढण्याचा पर्याय शोधला जात आहे. भाजप नेते रमेश आडसकर यांनी आपण माजलगावमधून लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप पक्ष कुठला हे ठरले नसले तरी कोणत्या तरी एका पवारांच्या पक्षाकडून लढण्यासही इच्छुक असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा – महायुती सरकारवर टीका करीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण बंडाच्या पवित्र्यात
माजलगावमधून मोहन जगताप, राधाकृष्ण होके पाटील या नेत्यांनीही विधानसभा लढण्याची तयारी सुरू केली आहे. मोहन जगताप यांनी अलीकडेच माजलगावमध्ये मेळावा घेऊन चाचपणी केली आहे. जगताप हे शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे. तर अशीच चर्चा राधाकृष्ण होके पाटीलही यांच्याबाबतही सुरू आहे. रमेश आडसकरही उमेदवारीवर दावा सांगण्यासाठी मतदारसंघात दौरे करताना दिसत आहेत.
हेही वाचा – राजेश टोपे यांना शिवसेनेचे आव्हान
माजलगाव विधानसभा मतदारसंघावर सुमारे चार दशकांपासून सोळंके घराण्याचे वर्चस्व आहे. प्रकाश सोळंके यांचे वडील सुंदरराव सोळंके हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. तर प्रकाश सोळंके हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्री राहिलेले आहेत. आता ते निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून पुतणे जयसिंह सोळंके यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत.