पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीन मतदारसंघांवर दावा केला आहे. त्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले कोथरूड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाबरोबरच वडगाव शेरी मतदारसंघाचा समावेश आहे. याबाबतचा अहवाल स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आला आहे. मात्र, हडपसर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ठिगणी पडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील एकाच मतदारसंघावर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे हा तिढा वाढला आहे. हीच परिस्थिती शहरातील दोन मतदारसंघांतही निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी शहरातील जागांसंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याची जबाबदारी उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानुसार कोथरूड, हडपसर या मतदारसंघांबरोबरच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची मागणी करणारा अहवाल त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे दिला आहे.

हेही वाचा – ‘संपुआ’ सरकारच्या स्थिरतेत येचुरींचे योगदान महत्त्वाचे; शरद पवार यांच्याकडून आठवणींना उजाळा

हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार आहेत. कोथरूडमधून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह माजी गटनेता पृथ्वीराज सुतारही इच्छुक आहेत. तर, हडपसरमधून माजी आमदार महादेव बाबर यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या तिघाही इच्छुकांनी तशी भावना पत्राद्वारे वरिष्ठ नेत्यांना यापूर्वीच कळविली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोथरूड शिवसेनेला मिळेल, अशी दाट शक्यता आहे. मात्र हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघावरून तिढा निर्माण होणार आहे.

हेही वाचा – विधानसभेचे पूर्वरंग: आरक्षणावरून असंतोष की ‘लाडकी बहीण’?

वडगाव शेरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. हडपसरमधून शहराध्यक्ष प्रशांत जगताप इच्छुक आहेत. त्यामुळे वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहावा, यासाठी जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातील काही भागात शिवसेनेची मोठी ताकत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune because of the thackeray group the spark of controversy in the mahavikas aghadi print politics news ssb