पुणे : भाजपच्या विद्यमान शहराध्यक्षांचा कालावधी संपायला आला असताना भाजपपुढे शहराच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची, हा यक्षप्रश्न पडला आहे. राज्यात विविध प्रश्नांवरून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न होत असताना आणि आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता पुन्हा ब्राह्मण शहराध्यक्ष निवडायचा की, इतर मागावसर्ग (ओबीसी) किंवा मराठा समाजाला संधी देऊन सामाजिक समतोल राखायचा, हा तिढा भाजपपुढे निर्माण झाला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा कटू अनुभव पाठीशी असल्याने ‘कसब्या’ची पुनरावृत्ती कशी टाळता येईल, यासाठी शहराध्यक्ष निवडीबाबत भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.

विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा कार्यकाळ संपायला आला असल्याने नवीन शहराध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मुंबईत नुकतीच बैठक झाली. शहराध्यक्ष निवडीतील सामाजिक समीकरणे जुळविताना भाजपची कोंडी झाली आहे. ब्राह्मण, ओबीसी की मराठा समाजाला संधी द्यायची, यावर सध्या शहर भाजपमध्ये खल सुरू झाला आहे.

विद्यमान शहराध्यक्ष घाटे यांनी पुणे महापालिकेमध्ये सभागृह नेता म्हणूनही कामकाज पाहिले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका झाल्यास त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, असे मानणारा एक गट आहे. त्या गटातून घाटे यांनाच पुन्हा संधी देण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. दुसऱ्या गटाकडून घाटे यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देण्यात येत आहे. त्यांची कामकाजाची आक्रमक शैली अनेकदा पक्षाला अडचणीत आणते. त्यामुळे त्यांच्याऐवजी यावेळी ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवावी, असा अट्टाहास धरण्यात आला आहे.

शहर भाजपकडे शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे नेते आहेत. त्यांच्यापैकी एकाला संधी द्यावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामध्ये कसब्याचे आमदार हेमंत रासने, विधान परिषदेतील आमदार योगेश टिळेकर, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांची नावे चर्चेत आहेत. या चारही जणांचा राजकारणातील अनुभव दांडगा आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, असा अंदाज बांधून ओबीसी नेतृत्त्वाच्या हाती पक्षाचा कारभार देण्याबाबत भाजपच्या राजकीय वर्तुळात सध्या चिंतन सुरू आहे.

टिळेकर हे हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी भाजप युवा मार्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपच्या ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते. रासने यांना पोटनिवडणुकीत पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, कसब्यातून त्यांनी यश मिळविले. भिमाले आणि बीडकर यांचा महापालिकेत नगरसेवक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे या चौघांपैकी एकाची शहराध्यक्ष पदावर वर्णी लागण्यासाठी भाजपचा एक गट सक्रिय झाला असल्याची चर्चा आहे.

माजी आमदार जगदीश मुळीक यांना २०२० मध्ये शहराध्यक्ष पद देण्यात आले होते. मात्र, सध्या त्यांच्याकडे संघटनात्मक कोणतेही जबाबदारी नाही. विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे गेल्याने त्यांची संधी गेली. विधान परिषदेत त्यांना स्थान मिळेल, असा शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यांना पुन्हा डावलण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी या समाजातील नेतृत्वाला स्थान देण्याबाबतही मुंबईत झालेल्या बैठकीत उहापोह करण्यात आला. मात्र, ब्राह्मण, ओबीसी की मराठा, या त्रिकाेणात सध्या भाजप अडकून पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकमानस विचारात न घेता निर्णय घेतल्यास काय होते, याचा कटू अनुभव कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने घेतला आहे. त्यामुळे ‘कसब्या’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहराध्यक्ष निवडीबाबत भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.