सुजित तांबडे
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराची व्यूहरचना आखून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली असली, तरी गटबाजीने पोखलेल्या पुण्यातील काँग्रेसमध्ये मात्र प्रत्येक गट एकमेकांवर लक्ष ठेवण्यात शक्ती पणाला लावत आहे.
पुण्यातील काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांचा एक गट आहे. दुसरा गट हा प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे समर्थकांचा आहे. त्या दोन्ही गटांकडून इच्छुक उमेदवारांची नावे पुढे करण्यात येत असताना, आता माजी शहराध्यक्ष अभय छाजेड हेदेखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे नाव चर्चेत आले आहे. छाजेड हे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. कलमाडी हे सक्रिय राजकारणापासून दूर झाल्यानंतर छाजेड हेदेखील गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त होते. त्यांचे नाव इच्छुक उमेदवार म्हणून येऊ लागल्याने एक गट हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या एका गटाने थेट पक्षाच्या ‘हायकमांड’च्या एका महिला स्वीय सहायकाशी संपर्क वाढविला आहे. चर्चेत असलेल्या महिला पीए यांच्या गेल्या काही दिवसांपासून पुणे भेटी वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा… नंदुरबार काँग्रेसमधील मरगळ कायम
हेही वाचा… ‘शिवमहापुराण कथे’तून अमरावतीत राणा दाम्पत्याचा मतांचा जोगवा
काँग्रेसच्या एका गटाकडून अरविंद शिंदे आणि छाजेड यांचे नाव पुढे करण्यात येत आहे, तर दुसऱ्या गटाकडून माजी आमदार मोहन जोशी यांचे नाव चर्चेत आहे. या तिन्ही नावांवर वाद झाल्यास कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव पुढे करण्याची खेळी आखण्यात आली आहे.