पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शहरातील जागा वाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित झाले असले तरी, जागा वाटपात हडपसरसह वडगावशेरी आणि पर्वती विधानसभा मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपात हा मतदारसंघ कोणाला मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तूर्त सावध भूमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यादृष्टीने शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील जागा वाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित झाले आहे. त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी तीन-तीन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र या दोन्ही पक्षांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने जागा वाटपात हडपसर, वडगावशेरी आणि पर्वती विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – परिपक्व नाही म्हणणार्‍या पुतण्यालाच मायावतींनी केले उत्तराधिकारी; यामागची नेमकी रणनीती काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला या तीन मतदारसंघांवर दावा करण्यात आला होता. तर, कसबा, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने हक्क सांगितला आहे. कोथरूड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार आहेत. त्यामुळे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि पृथ्वीराज सुतार यांनी जागा वाटपात हा मतदारसंघ घ्यावा, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. हडपसरमध्येही शिवसेनेचे महादेव बाबर माजी आमदार आहेत. त्यामुळे त्यांनीही पक्षाकडे तशी मागणी केली आहे. मात्र या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. याशिवाय वडगावशेरी आणि पर्वती विधानसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ मिळावा, अशी शिवसेनेची मागणी आहे. पर्वती काँग्रेसकडे तर, वडगावशेरी राष्ट्रवादी काँग्रेसने मागितला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये हडपसर, पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघ कळीचे ठरणार असल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र त्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. जागा वाटपाचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. मतदारसंघावर दावा करणे अयोग्य नाही, मात्र ताकद पाहूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर, जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल, अशी विधाने टाळावीत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

हेही वाचा – शेतकरी, उद्योजक ते अभिनेता-क्रिकेटपटू; १८ व्या लोकसभेतील नवे खासदार काय करतात?

पक्षाच्या बैठकीत हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला या मतदारसंघाची मागणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानुसार मतदारसंघनिहाय आढावा घेत अहवाल दिला जाणार आहे. – प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष