पुणे : पुण्यातील काँग्रेस भवनात शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात महाविकास आघाडी अधिक भक्कम करण्याबरोबरच तिन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच जाहीर सभेत शरद पवार हे तुतारी फुंकून कोणाला लक्ष्य करणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर १९९९ पासून आतापर्यंत पुण्यातील काँग्रेस भवनाला तीन वेळाच भेट दिली आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस भवनात पत्रकार परिषद झाली होती. त्या परिषदेला शरद पवार उपस्थित राहिले होते. २०१४ मध्ये पवार यांची काँग्रेस भवनमध्ये सभा झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार यांनी काँग्रेस भवनला धावती भेट दिली होती.. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दुखवू नका, अशी कार्यकर्त्यांना सूचना यापूर्वीच पवारांनी केली आहे.

हेही वाचा : कोल्हापुरातील उमेदवार निवडीची अनिश्चितता कायम

पुणे, बारामती, शिरूरची रणनीती

या महामेळाव्यामध्ये पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणनीती निश्चित होणार आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात डाॅ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील. मात्र, पुण्याच्या जागेबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसबरोबरच या जागेवर पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस दावा करत आली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या जागेवर दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. मेळव्याच्या निमित्ताने यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : कोकणात भाजपाची वर्चस्वाची, तर शिंदे गटाची अस्तित्व टिकवण्याची लढाई

वंचित बहुजन आघाडीचे काय?

या मेळाव्यात इंडिया आघाडीशी संबंधित पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचा दावा इंडिया आघाडीकडून करण्यात येत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीबाबत अद्यापही साशंकता आहे. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यांचा समावेश झाला असला, तरी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune mahavikas aghadi melava at congress bhavan ahead of lok sabha elections 2024 print politics news css