पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येऊ लागली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. पवार यांनी राजकारणात कोणी कोणाचे कायमचे मित्र आणि कायमचे शत्रू नसल्याचे दाखवून राजकीय हाडवैर विसरून आजवरच्या कट्टर विरोधकांच्या भेटी घेऊन धक्कातंत्र अवलंबले आहे. भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांच्याबरोबर असलेले शत्रुत्त्व विसरून त्यांनी तब्बल २५ वर्षांनी भेट घेतल्यानंतर बारामतीतील पवार यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबीयांची तब्बल ५५ वर्षांनी भेट घेऊन राजकारणातील विरोधाला तिलांजली दिली.

बारामती तालुक्यामध्ये पवार आणि काकडे कुटुंबीयांमध्ये कायमच शत्रुत्त्वाची भावना राहिली आहे. शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणाला सुरुवात करण्यापूर्वी बारामतीवर काकडे कुटुंबीयांचे वर्चस्व होते. मात्र, पवार यांनी प्रवेश केल्यानंतर काकडे कुटुंबांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. बारामतीमध्ये १९७१ ते १९८४ या कालावधीत काकडे कुटुंबीयांची चलती होती. पवार यांच्या हाती बारामतीच्या सूत्रे आल्यानंतर काकडे कुटुंब हे मागे पडले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून काकडे कुटुंबीयांशी जुळून घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे चिरंजीव अभिजीत काकडे यांना त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली.

हेही वाचा : ‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ

आता बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येऊ लागली असताना शरद पवार यांनी बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांची त्यांनी तब्बल २५ वर्षांनी भेट घेतली. त्यानंतर आता काकडे कुटुंबीयांची भेट घेऊन राजकीय धक्का दिला. माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काकडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

हेही वाचा : भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक

काकडे-पवार कुटुंबीयांतील राजकीय संघर्ष

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये काकडे कुटंबीयांतील रामराव काकडे यांनी १९७१ मध्ये अपक्ष निवडणूक लढविली. त्यावेळी काँग्रेसचे रघुनाथ खाडीलकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९७७ च्या निवडणुकीत माजी खासदार संभाजीराव काकडे हे भारतीय लोकदल या पक्षाकडून निवडणुकीला उभे राहिले. त्यांनी माजी खासदार विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव केला होता. त्या विजयाने काकडे कुटुंबीयांच्या हाती बारामतीची सूत्रे आली. त्यानंतरच्या निवडणुकीत संभाजीराव काकडे हे जनता पक्षाकडून उभे राहिले. मात्र, काँग्रेसचे माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी त्यांचा पराभव केला. १९८४ च्या निवडणुकीत पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पाटील यांना तिकीट नाकारून काँग्रेसने पवारांना उमेदवारी दिली. त्यामुळे पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली. त्यामध्ये पवार यांनी पाटील यांचा पराभव करत दिल्ली गाठली. त्यानंतरच्या १९८९ च्या निवडणुकीच्यावेळी पवार हे राज्याच्या राजकारणात आले. काँग्रेसने पुन्हा शंकरराव पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात संभाजीराव काकडे यांनी जनता दलाकडून निवडणूक लढविली. त्यावेळी पाटील यांनी काकडे यांचा पराभव केला. १९८९ पर्यंत पवार विरूद्ध काकडे कुटुंब असा राजकीय संघर्ष राहिला. त्यानंतर काकडे कुटुंब हे सक्रिय राजकारणापासून थोडे दुरावले. १९९८ च्या निवडणुकीत भाजपकडून काकडे कुटुंबीयांतील विराज काकडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा निभाव लागला नाही. दरम्यानच्या काळात १९९१ मध्ये अजित पवार हे, तर २००४ पासून खासदार सुप्रिया सुळे या बारामतीचे प्रतिनिधित्त्व करत आल्या आहेत. त्यामुळे काकडे कुटुंब हे आता बारामतीच्या राजकारणात मागे पडले आहे.

Story img Loader