राजेश्वर ठाकरे
नागपूर : ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान नागपूरचे काँग्रेस नेते व सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.के. पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने यात्रेच्या पुढच्या टप्प्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसने सर्व संबंधितांना दिल्या आहेत. राहुल गांधी यांच्या शेगाव येथील जाहीर सभेला जाणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका नेण्यात येणार आहे.
हेही वाचा… शिवराज मोरे : विद्यार्थी चळवळीतून राजकारणात
राज्यात भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यावर यात्रेदरम्यान के.के. पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. यात्रा पुढील आठवड्यात विदर्भात दाखल होत असून १८ नोव्हेंबरला शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा आहे. सभेला जाण्यासाठी नागपूर शहर काँग्रेसकडे सुमारे तीन हजार कार्यकर्ते, नागरिकांनी नावे नोंदवली आहे. प्रत्येकाला त्यांचा रक्तगट व आधार कार्ड मागवण्यात आले आहे. यात्रेकरूंची यादी अंतिम करण्यासाठी शुक्रवारी बैठक होणार आहे. यात वाहन व्यवस्थेसोबतच यात्रेकरूंंच्या आरोग्य सुरक्षिततेवरही चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, के.के. पांडे यांच्या मृत्यूनंतर प्रदेश काँग्रेसने शहर व जिल्हा काँग्रेसला विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सभेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहन ताफ्यासमोर विशेष वाहन (पालयट कार) तसेच किमान एक सुसज्ज रुग्णवाहिकेची व्यवस्था शहर काँग्रेस करणार आहे.
हेही वाचा…काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मोदींनी सहकार क्षेत्रावर लावलेले कर रद्द करणार, राहुल गांधी यांचे आश्वासन
शहर काँग्रेसचे पदाधिकारी प्रा. दिनेश बानाबाकोडे म्हणाले, यात्रेत सहभागी होण्यासाठी नागपुरातील महिला काँग्रेस, सेवादल आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यापूर्वीच नांदेडला गेले आहेत. आता शेगावच्या जाहीर सभेला जाण्याची शहर काँग्रेसचे कार्यकर्ते तयारी करीत आहेत. ब्लॉक अध्यक्षांकडून नावे आली असून समन्वयक ती यादी अंतिम करणार आहेत. त्यावर शहराध्यक्ष शिक्तामोर्तब करतील. सर्वच वयोगटातील नागरिक जाहीर सभेसाठी जाणार आहेत. यात्रेकरूंचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी करावयाच्या उपाय योजनांवर शुक्रवारच्या बैठकीत चर्चा केली जाईल.
नागपूरहून शेगावकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसच्या वैद्यकीय विभागातील १२ डॉक्टर्स व एक रुग्णवाहिका ताफ्यात राहणार आहेत, असे नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले.