कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेची हाक दिल्यानंतर पक्षाच्या वतीने अनेक नागरी संघटनांना या भव्य संपर्क कार्यक्रमात योगदान देण्यासाठी पाचारण करण्यात आले. एखाद्या व्यक्तिपेक्षा ही यात्रा भव्य-दिव्य करण्याचा पक्षाचा मानस आहे. पक्षातून बाहेर पडलेले जुने-जाणते गुलाम नबी आझाद यांनी राहुल यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केल्यानंतर कॉँग्रेसच्या १५० दिवसांत १२ राज्यांतून ३५०० किमीपेक्षा अधिक पल्ला गाठणाऱ्या यात्रेकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.
समाजाच्या तळागाळात काम करणारे बरेच कार्यकर्ते यात्रेचा भाग म्हणून काय पवित्रा घेतात ते लवकरच दिसणार आहे.यात्रेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांमध्ये स्वराज पार्टीचे प्रमुख योगेन्द्र यादव यांचा समावेश असेल. शेतकरी बिलाविरुद्ध काढण्यात आलेल्या संयुक्त किसान मोर्चातही ते अग्रेसर होते. आपल्याला दिलेली आश्वासणे एकाही पक्षाने पूर्ण केली नसल्याने त्यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडुकीसाठी नोटाचा आग्रह धरला होता.
तसेच सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या राष्ट्रीय सल्लागार समितीचा भाग असलेल्या अरुणा रॉय या देखील यात्रेत सामील होतील. रॉय यांना समाजातील नेतृत्वासाठी २००० साली रामन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. योगेन्द्र यादव यांच्या स्वराज पार्टीचे सक्रीय सदस्य आणि २०१५ मध्ये साहित्य अकादमी आणि पद्मश्री पुरस्कार परत करणारे देवनूरा महादेव यांच्यासह लेखक आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासक गणेश देवी, सफाई कर्मचारी आंदोलनाचे संस्थापक आणि नेते बेझवादा विल्सन, गांधीवादी कार्यकर्ते आणि गांधी पीस फाऊंडेशनचे माजी उपाध्यक्ष पी व्ही राजगोपाल, माजी प्रशासकीय अधिकारी शरद बेहर, स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि महिला तसेच अल्पसंख्याक समस्याना आपल्या लेखणीद्वारे वाचा फोडणाऱ्या सईदा हमीद, सतर्क नागरीक संघटनेच्या संस्थापिका सदस्या अंजली भारद्वाज अशा दिग्गजांचा यात्रेत समावेश असेल.